रुपयाच्या पडझडीचा फायदा   

वृत्तवेध 

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले की भारतीय माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांना आर्थिक फायदा होतो, अशी सर्वसाधारण धारणा आहे. कारण देशातील बहुतांश मोठ्या आयटी कंपन्यांना अमेरिकेसह परदेशी बाजारपेठांमधून डॉलरमध्ये उत्पन्न मिळते. डॉलर मजबूत झाल्यास त्याच उत्पन्नाचे रुपयातील मूल्य वाढते आणि कंपन्यांच्या महसुलात वाढ दिसून येते. मात्र, याचा अर्थ आयटी कंपन्यांच्या समभागांमधून गुंतवणूकदारांना नेहमीच मोठा परतावा मिळतो, असे नाही. 1 जानेवारी 2010 ते 2 जुलै 2026 या कालावधीतील आकडेवारीच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
   
कमकुवत झाल्यानंतर आयटी कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा झाली असली, तरी त्या प्रत्येक वेळी आयटी समभागांनी बाजारापेक्षा अधिक परतावा दिला, असे घडलेले नाही. त्यामुळे केवळ डॉलर मजबूत झाला किंवा रुपयाचे अवमूल्यन झाले म्हणून आयटी क्षेत्रातील समभाग खरेदी करणे योग्य ठरेलच, असे नाही, असे विश्‍लेषकांचे मत आहे. अमेरिकेसह इतर परदेशी ग्राहकांवर भारतीय आयटी उद्योगाचा मोठा व्यवसाय अवलंबून आहे. कंपन्यांना मिळणारे बहुतांश उत्पन्न डॉलरमध्ये असल्यामुळे रुपयाचे मूल्य कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम महसुलावर आणि नफ्यावर दिसून येतो. मात्र समभाग बाजारात कंपनीच्या उत्पन्नाबरोबरच जागतिक आर्थिक परिस्थिती, ग्राहकांकडून मिळणार्‍या नव्या ऑर्डर्स, व्याजदर, तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, जागतिक मंदीची शक्यता आणि गुंतवणूकदारांचा विश्‍वास यांसारखे अनेक घटक समभागांच्या किमती ठरवतात. त्यामुळे चलन विनिमयातील बदल हा समभागांच्या कामगिरीवर परिणाम करणारा एकमेव घटक नसल्याचे या विश्‍लेषणातून स्पष्ट झाले आहे.
 
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, आयटी क्षेत्रात गुंतवणूक करताना केवळ रुपया-डॉलर विनिमय दराकडे पाहून निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. कंपनीची आर्थिक स्थिती, भविष्यातील व्यवसाय, नफा, ऑर्डर बुक, जागतिक मागणी आणि उद्योगातील स्पर्धा या सर्व बाबींचा विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. रुपयातील घसरण आयटी कंपन्यांसाठी महसूल वाढवण्यास मदत करू शकते.

Related Articles