कास पठारावर ’चवर’ फुलांचा बहर   

सातारा, (प्रतिनिधी) : जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पुष्प पठारावर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पांढर्‍या ’चवर’ प्रजातीच्या फुलांचा बहर फुलण्यास सुरुवात झाली आहे. ही यंदाच्या फुलोत्सवाची नांदी आहे.पावसाच्या सरी, दाट धुके, हिरवागार निसर्ग आणि थंडगार वातावरणामुळे कास पठाराचे सौंदर्य खुलून आले असून, पावसाळी पर्यटनाच्या आनंदासाठी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. सध्या कास परिसरात अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. 
 
पठारावर पसरलेले धुके आणि ढगांचे मनोहारी दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. चवर फुलांच्या बहरामुळे पठारावर फुलांचा हंगाम सुरु झाल्याची चाहूल लागली आहे. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत असून, निसर्गप्रमी, छायाचित्रकार आणि ट्रेकर्स यांच्यासाठी कास हे प्रमुख आकर्षण ठरत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑगस्टच्या उत्तरार्‍यापासून सप्टेंबर महिन्यात कास पठारावरील विविध दुर्मिळ रानफुले बहराच्या शिखरावर पोहोचतील. सोनकी, टोपली कारवी, सीतेची आसवे, स्मिथिया, इम्पेशन्स, उट्रिक्युलॅ रिया यांसारख्या अनेक रंगीबेरंगी आणि दुर्मिळ वनस्पतींची फुले उमलल्यानंतर संपूर्ण पठार नैसर्गिक फुलांच्या गालिच्याने सजणार आहे. 
 
जगभरातील वनस्पती अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हा काळ विशेष आकर्षणाचा मानला जातो. कास पठार हे पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अनमोल ठेवा मानले जाते.येथे शेकडो प्रकारच्या रानफुलांसह अनेक दुर्मिळ व स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. त्यामुळे या संवेदनशील परिसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी पर्यटकांनी फुलांवर पाय न ठेवणे, कचरा न टाकणे, फुले न तोडणे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. येत्या काही आठवड्यांत कास पठारावरील फुलोत्सव अधिक रंगतदार होणार असल्याने पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles