पावसापासून बचावासाठी मेंढरांना रेनकोट   

सातारा, (प्रतिनिधी) : कास-धावली परिसर हा जिल्ह्यातील अतिवृष्टीचा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या महिनाभरापासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी आणि पशुपालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत धावली गावातील युवक विकास जाधव यांनी  मेंढरांचे संरक्षण करण्यासाठी अनोखी शक्कल लढवत प्रत्येक मेंढरासाठी खास रेनकोट शिवून त्यांना दररोज पावसात परिधान करण्याची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या कल्पकतेचे कौतुक होत आहे. मुंबईतील नोकरी सोडून सुमारे आठ महिन्यांपूर्वी विकास जाधव यांनी आपल्या गावात परत येत आधुनिक पद्धतीने मेंढीपालन व्यवसाय सुरू केला. मेहनत, नियोजन आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच या व्यवसायात यशाची चुणूक दाखवली. कास परळी परिसरात सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे मेंढरे भिजून गाठण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आजारपण, वजन घटणे आणि मृत्यूची शक्यता निर्माण होते. 
 
यावर उपाय म्हणून विकास जाधव यांनी जलरोधक कापडापासून प्रत्येक मेंढराच्या आकारानुसार रेनकोट तयार करून घेतले. त्यामुळे पावसातचरण्यासाठी सोडले तरी मेंढरे मिजत नाहीत आणि त्यांचे आरोग्यही सुरक्षित राहत आहे. या अभिनव प्रयोगामुळे मेंढरांची उत्पादकता टिकून राहण्यास मदत होत असून इतर पशुपालकही हा प्रयोग पाहण्यासाठी धावली येथे भेट देत आहेत. कमी खर्चात प्रभावी उपाय कसा करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रिया परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.अतिवृष्टीच्या संकटातही न डगमगता आपल्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी केलेली ही कल्पक उपाययोजना ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विकास जाधव यांच्या या प्रयोगामुळे आधुनिक विचार आणि पारंपरिक पशुपालन यांचा सुंदर संगम पाहण्य मिळत आहे.

Related Articles