E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
राष्ट्राचे लोकमान्य दैवत
Wrutuja pandharpure
03 Aug 2026
शैलेंद्र रिसबूड
लोकमान्य म्हणजे शतकाशतकामधून एखादाच जन्मास यावा, असा महापुरुष. त्यांच्या धोरणांविषयी कितीही मतभेद असोत; पण त्यांच्या मोठेपणाविषयी शत्रू-मित्राचेही एकमत होते. स्वत:चा काडीमात्र संबंध नसतां, केवळ सार्वजनिक हिताच्या बुद्धीने, लहानातील लहान कामापासून मोठ्यातील मोठ्या कामाला हात घालण्यास टिळक अहोरात्र तयार होते, हेच त्यांच्या मोठेपणाचे रहस्य. बलभीम म्हटले, की शरीर-सामर्थ्य, गणपती म्हटले, की बुद्धि-सामर्थ्य आणि लोकमान्य म्हटले म्हणजे फक्त आणि फक्त बाळ गंगाधर टिळक.
लहानपणापासून टिळकांनी बाळ गंगाधर टिळक किंवा बा. गं. टिळक असा किंवा इ.ॠ.ढळश्ररज्ञ असाच स्वत:चा उल्लेख केलेला दिसतो. ‘केसरी-मराठा’चे संपादक, गीतारहस्याचे लेखक हे बाळ गंगाधर टिळकच होते. ‘ओरायन’ किंवा ‘आर्टिक होम इन द वेदाज’ याचे लेखक किंवा मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक हे इ.ॠ.ढळश्ररज्ञ याच नावाने प्रसिद्ध होते.
लोकमान्य ही अनन्यसाधारण अशी पदवी टिळकांना कोणी कधी दिली हे सांगणे म्हणजे नदीचे मूळ किंवा ऋषींचे कुळ ठरविण्याइतकेच कठीण आहे. त्या अमर शब्दाचा उच्चार प्रथम करणारे कै. ओकशास्त्री असोत किंवा ’भालाकार’ भोपटकर असोत; पण त्याचा प्रसार वायुवेगाने करण्यास प्रो. शिवरामपंत परांजपे यांनी आपल्या ’काळ’ पत्रांत आपल्या प्रभावी लेखणीने लिहिलेला ’लोकमान्य व राजमान्य’ हा लेख कारणीभूत झाला, यात काही शंका नाही. टिळकांना ’लोकमान्य’ ही पदवी केव्हा मिळाली, याविषयी भिन्न मते पाहायला मिळतात.
1905 मध्ये हा शब्द टिळकांच्या नावामागे लावला व मग तो रूढ झाला असे ’भाला’कर भास्कर बळवंत उर्फ भाऊसाहेब भोपटकर यांचा दावा आहे, तर वकील व लेखक दत्तो अप्पाजी तुळजापूरकर यांनी प्रस्तुत शब्दनिर्मितीचे श्रेय न्यू इंग्लिश स्कूलचे संस्कृतशिक्षक महादेव पांडुरंग ओक शास्त्री यांना दिले असून त्यांनी एक प्रसंग सांगितला आहे. पुण्यात जोशी या आडनावाचे एक गृहस्थ होते. या श्रीमंतांच्या पत्नीलाच एका वर्षी चातुर्मासात काही नवीन उपक्रम करावा असे वाटून संस्कृत शिक्षणाचा एक वर्ग त्यांनी सुरू केला व त्याचे उद्यापन लोकमान्यांच्या हस्ते केले. लोकमान्यांनीही या उपक्रमाचा मनःपूर्वक गौरव केला. 1905 मध्ये विजयादशमीच्या दिवशी इंग्रजी सहाव्या-सातव्या इयत्तांची निवडक मुलांच्या एका मोफत संस्कृत वर्गाचा समारंभ होता व अध्यक्ष म्हणून टिळकांना बोलावले होते. समारंभाप्रीत्यर्थ ओकशास्त्री यांनी जे संस्कृत श्लोक रचले, त्यांना ’इति सभाध्यक्ष ’लोकमान्य बाळ गंगाधर टिळकमुदिशय’ असे एक वाक्य जोडले होते. लोकमान्यांना लोकमान्य म्हणण्याचा पहिला अधिकार किंवा खरे जनक न्यू इंग्लिश स्कूलमधील संस्कृत शिक्षक महादेवशास्त्री ओक यांना जातो, असे दत्तो अप्पाजी तुळजापूरकर यांनी लिहिले आहे.
राजमान्य आणि लोकमान्य
परंतु या शब्दाचा इतिहास 1905 या वर्ष मागे जातो. ’लोकमान्य’ या महनीय उपपदाविषयी लोकाग्रणी असलेल्या टिळकांना ’लोकमान्य’ या उपपदानेच संबोधिले नि ओळखले जाते त्याचे श्रेय ’काळ’ कर्ते शिवरामपंत परांजपे यांना आहे. 1900 मध्ये ’राजमान्य व लोकमान्य’ या मथळ्याचा लेख शि.म.परांजपे यांनी आपल्या ’काळ’ पत्रात प्रसिद्ध केला. ’याविषयी सावरकर लिहितात - व्यक्तीच्या नावामागे सन्मानदर्शक अशी राजमान्य राजश्री ही उपपदे लावण्याची आपली रूढ पद्धत. या पद्धतीला उद्देशून शिवरामपंत परांजपे यांनी आपल्या ’काळ’मध्ये ’राजमान्य की लोकमान्य’ असा चटकदार लेख लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिले होते, की जेव्हा आपण स्वतंत्र होतो, आपले राज्य होते, आपला स्वकीय राजा होता, तेव्हा कोणा व्यक्तीला राजमान्य किंवा राजश्री हे उपपद लावणे गौरवास्पद होते; पण आज ते स्वराज्य कुठे आहे? आज आपण सर्वजण आहोत परकीय राज्याचे दासानुदास! परक्यांचे दास झालेल्यांनी एकमेकांना राजमान्य नि राजश्री म्हणणे नि म्हणवून घेणे म्हणजे अन्योन्यांची विटंबना करणे आहे. आता आपण सर्व भारतीयांनी ’राजमान्य राजश्री’ हे उपपद न लावता परस्परांनी ’देशबंधु’ या उपपदाने परस्परांना संबोधावे. त्यातही जे आजच्या परकीय राज्याच्या डोळ्यात खुपणारे आमचे लोकाग्रणी आहेत त्यांनाही राजमान्य म्हणणे म्हणजे तर त्यांचा उपमर्द करण्यासारखे आहे. आमचे लोकाग्रणी टिळक यांचेच उदाहरण घ्या. आज परराज्यात टिळकांना राजमान्य म्हणणे म्हणजे त्यांचे टिळकपणच छिनावून घेण्यासारखे आहे. यास्तव आपण यापुढे टिळकांसारख्या लोकाग्रणींना लोकमान्य टिळक असेच संबोधिले पाहिजे’. ’काळ’कर्त्यांची ही सूचना इतकी लोकप्रिय झाली, की टिळकांना तेव्हापासून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर हळूहळू सारे भरत खंडही लोकमान्य या महनीय उपपदानेच संबोधू लागले. नव्हे, ते त्यांचे नित्याचे उपनावच पडले. त्यामुळे केवळ लोकमान्य म्हटले तरी ते लोकमान्य टिळक असेच लोक समजतात. लोकमान्य’ हे विशेषण कोल्हापूरच्या एका संस्थेने टिळकांस अर्पिलेल्या एका मानपत्रात घातले आणि नंतर तो शब्द रूढ झाला असे काहींचे म्हणणे आहे. विख्यात इतिहासकार वि.का. राजवाडे यांच्या मते कोल्हापुरात टिळकांच्या समक्ष झालेल्या एका व्याख्यानामध्ये ही उपाधी त्यांना देण्यात आली.
टिळकांबरोबर काम करणारे पुण्याचे प्रकाशक ’बळवंत गणेश दाभोळकर’ यांच्या म्हणण्यानुसार 1893 मध्येच ’धर्म आणि मीमांसा - नैसर्गिक धर्म आणि मौतिक धर्म’ हे पुस्तक त्यांनी टिळकांना अर्पण केले. त्यावेळी अर्पणपत्रिकेत गौरवपूर्वक त्यांचा नामोल्लेख करतांना त्यांच्या नावामागे कित्येक दिवस चिंतन करून त्यांस सर्वप्रथम ’लोकमान्य’ हे उपपद लिहिले असे ते म्हणतात.
उचित उपाधी
पण खर्या अर्थाने ’लोकमान्य’ ही बिरुदावली त्यांना लागू झाली ती 1916 पासून. 1916 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीप्रीत्यर्थ फार मोठा समारंभ लोकांनी केला. टिळक नुकतेच मंडालेहून सुटून आले होते. तेव्हापासून टिळक जास्त लोकप्रिय झाले होते.केवळ पुण्यात किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर ते लोकांमध्ये प्रिय झाले होते. त्यामुळे 1916 च्या या समारंभात महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी लोकमान्यांचा उल्लेख लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असा केला आणि मग सर्वच मंडळी त्यांना लोकमान्य टिळक या नावानेच ओळखू लागले. उगम कधीचाही असला तरी ही उपाधी उचितच होती.
टिळकांनी आपले बुध्दिसर्वस्व व आपल्या जन्मांतील सर्व कर्तबगारी लोकांच्या व राष्ट्राच्या चरणांवर वाहिली म्हणून लोकांनी एकमताने त्यांना ’लोकमान्य’ ही पदवी अंतःकरणापासून दिली व लोकांनी आपल्या हृदयामध्ये त्यांच्याबद्दल पूर्ण आदरबुद्धी सांठवून ठेवली. सार्वजनिक जीवनामध्ये थोरवीचा नवा मापदंड प्रस्थापित करणारे टिळक हे पहिलेच नेते होते. त्यांच्या आधीच्या नेत्यांना राजमान्यता असायची. टिळकांनी, सार्वजनिक दृष्टी राजाकडून लोकांच्या दिशेने वळवली. राजमान्यतेच्या वाटेवरून टिळक गेले असते, तर त्यांनी काही सन्मान सहज प्राप्त झाले असते; पण त्यांनी सन्मानांवर पाणी सोडले. त्यामुळेच त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली. आज लोकमान्य असते तर असा प्रश्न विचारवंतांच्या डोळ्यापुढे चटकन उभा राहतो. कारण ’लोकमान्य’ हे ’निश्चयाचे महामेरू’ व ’जनतेचे अचूक मार्गदर्शक’ होते. साहित्यसम्राट न.चिं. केळकर तथा तात्यासाहेब केळकर यांनी त्यांचे वर्णन करताना म्हटल्याप्रमाणे, ते एका काळापुरते, जातीपुरते आणि राज्यापुरते मर्यादित ठेवता येणारे व्यक्तिमत्व नाही.
सर्वसामान्य माणसाबद्दल लोकमान्य टिळकांना कमालीचा जिव्हाळा वाटत असे, कारण लोककल्याणाशिवाय त्यांना दुसरे काही साधायचे नव्हते आणि म्हणूनच लोकमान्य हे बिरुद एकट्या टिळकांनाच लाभू शकेल. ज्यांच्या नामसंकीर्तनाचा कधीही कंटाळा येत नाही, अशा गेल्या शंभर-सव्वाशे वर्षातील महापुरुषात ज्यांचे नाव अग्रभागी राहील अशी व्यक्ती म्हणजे ’लोकमान्यच’. बाळ गंगाधर टिळक या अक्षरांमागेच जनतेने त्यांना उत्स्फूर्तपणे दिलेली ही पदवी शोभून दिसते, नव्हे या पदवीचे खरे मानकरी तेच आहेत.
Related
Articles
नक्षलवादी मानसिकतेवर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण द्यावे : सुप्रिया सुळे
18 Aug 2026
तलवारबाजीत भारताला तीन सुवर्णपदके
13 Aug 2026
पाकिस्तानातून २८४ परदेशी नागरिकांची होणार हकालपट्टी
18 Aug 2026
सिंहगडावर तरूणींशी असभ्य वर्तन;तोकडे कपडे घातल्याने मारहाण
18 Aug 2026
राहुल आणि सोनिया गांधींविरोधात तक्रार
18 Aug 2026
जम्मूमध्ये देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा