लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक   

गिरीष चिटणीस 

’स्पीचेस अ‍ॅन्ड रायटिंग्ज ऑफ टिळक’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत महायोगी अरविंद घोष यांनी म्हंटले आहे....’ इतिहासात लोकमान्य टिळक यांचे नाव एक राष्ट्रसंवर्धक म्हणून नमूद झाले आहे. जोपर्यंत देशाला आपल्या भूतकाळाविषयी अभिमान व भावी काळाविषयी आशा वाटते, तोपर्यंत त्यांचे नाव स्मरणात राहील.
 
1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली. त्यावेळी या साथीच्या बहाण्याखाली रँड व आयर्स्ट या दोन ब्रिटिश अधिकार्‍यांनी जनतेवर अनन्वित अत्याचार केले. प्लेगची साथ संपल्यावर घरांची झडती घेतली जाणार नाही, असे जाहीर केल्यावरही ब्रिटिशांची दडपशाही चालूच होती. याचे पर्यवसान म्हणजे 22 जून 1897 रोजी रँड व आयर्स्ट यांचे खून दामोदर चाफेकर आणि त्यांचे छोटे भाऊ यांनी केले. त्यांचे खून करणार्‍यांना पकडून देणार्‍यास ब्रिटिश शासनाने वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या प्रकरणात नंतर दामोदर चाफेकर यांना पकडून फाशी देण्यात आले. तसेच नंतरच्या कालावधीत दामोदर चाफेकर यांच्या दोन्ही भावांना फाशी देण्यात आले. टिळकांनी या खूनाबद्दल, पण त्याचबरोबर सरकारने स्वीकारलेल्या कडक धोरणाबद्दल केसरीतून तीव्र नापसंती व्यक्त केली आणि ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ तसेच सूड उगवणे म्हणजे प्रशासन नव्हे’, अशा शीर्षकाखाली दोन लेख लिहिले. या लेखांनी क्रांतीकारकांना स्वातंत्र्यलढ्यासाठी बळ मिळाले. ब्रिटीश शासन यामुळे पहिल्यांदाच भयभीत होऊन त्यांनी येन-केन प्रकारे टिळकांना तुरुंगात डांबण्याचा चंगच बांधला. केसरीत प्रसिद्ध झालेली एक कविता व शिवाजी महाराजांवरील लेख आक्षेपार्ह ठरवून 27 जुलै 1897 रोजी टिळकांना अटक केली गेली. टिळकांना जामिनावर सोडण्याचे तीन प्रयत्न अपयशी ठरल्यावर 4 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती बद्रुद्दिन तय्यबजी यांनी टिळकांचा जामीन अर्ज मंजूर केला. 8 सप्टेंबर 1897 रोजी सेशन्स कोर्टात न्यायमूर्ती स्ट्रॅची यांच्यापुढे टिळकांवरील खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्या न्यायमंडळात सहा युरोपीय व तीन भारतीय होते. अपेक्षेप्रमाणे जनतेत असंतोष पसरविण्याच्या आरोपाबद्दल इंडियन पिनल कोडच्या 124-अ कलमाखाली न्यायमूर्ती स्ट्रॅची यांनी 14 सप्टेंबर रोजी टिळकांना 18 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. या निकालामुळे साहित्यिकांची-संपादकांची लेखणी सत्ता उलथविण्यासाठी, क्रांतीकारकांना बळ देण्यासाठी उर्जा देते हे सर्वांच्या लक्षात आले. टिळकांना झालेल्या 18 महिन्यांच्या शिक्षेमुळे क्रांतीकारकांची टिळकांवरची श्रद्धा अधिक बळावली आणि त्यांच्या क्रांतीकारक कारवायांना वेग आला.
 
दामोदर चाफेकर यांच्याच क्लबमधील (संघटनेतील) गणेश द्रवीड आणि त्यांचे बंधू नीलकंठ द्रवीड यांनी पैशाच्या आमिषाने दामोदर चाफेकर यांचे नांव इंग्रज अधिकार्‍यास सांगितल्याने त्यांना जुलै 1897 मध्ये अटक करण्यात आली. वधस्तंभावर लटकवण्याची शिक्षा न्यायालयाने दामोदर चाफेकर यांना दिल्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट मागितली व भेट घेऊन अशी प्रार्थना केली की, मी लवकरच फाशी जाणार असून तोपर्यंत जेलमध्ये वाचण्यासाठी तुमच्या जवळचे गीतेचे पुस्तक द्या. तसेच फासांवरून मला उतरविल्यावर माझ्या मृतदेहाला भलत्या लोकांनी शिवून अग्नी देऊ नये अशी माझी इच्छा असून ती तुम्ही पुरवावी. अधिकार्‍यांच्या परवानगीने टिळकांनी आपल्या जवळचे नेहमीच्या वापरांतले गीतेचे पुस्तक सही करून दामोदरपंत चाफेकरांना दिले. टिळकांना 18 महिन्यांच्या तुरुंगाच्या शिक्षेसाठी प्रथम मुंबई येथील तुरुंगात व नंतर पुण्यातील येरवडा तुरूंगात ठेवण्यात आले. त्यांना तुरुंगात नारळापासून रजयासाठी काथ्या रंगविण्याचे काम देण्यात आले. लोकमान्य टिळक तुरूंगात असतानाच 18 एप्रिल 1898 रोजी दामोदर चाफेकर यांना फाशी देण्यात आली. टिळकांनी तुरूंगातूनच सूचना देऊन आपले भाचे धोंडोपंत विद्वांस यांच्यामार्फत दामोदर चाफेकर यांना फासावर दिल्यानंतर त्यांचे शव ताब्यात घेऊन विधि पूर्ण करीत अंत्यसंस्कार केले. लोकमान्य टिळक यांना स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल विशेषतः क्रांतीकारक स्वातंत्र्यसैनिकांची पाठराखण करण्याबद्दल पहिला 
तुरूंगवास 18 महिन्यासाठी देण्यात आला; पण सप्टेंबर 1898 मध्ये त्यांची मुदतीपूर्वी तुरुंगातून सुटका करण्यात आली.
 
बंगाली बाँब युगाचे ब्रह्मदेव म्हणून अरविंद घोष यांचे धाकटे भाऊ स्वातंत्र्यसेनानी बारींद्रकुमार घोष स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात विख्यात आहेत. बारींद्रकुमार घोष व त्यांचे सहकारी नुसतेच ’युगांतर’ या पत्राच्या माध्यमातून क्रांतीकारक विचार पेरत नव्हते तर, त्याचबरोबर त्यांनी शस्त्रसंग्रह करण्यासही प्रारंभ केला होता. त्यांचे एक सहकारी हेमचंद्र दास यांनी आपली स्थावर संपत्ती विकून 1906 च्या सप्टेंबर महिन्यात फ्रान्सला प्रयाण केले होते. त्यांनी तेथे अभिनव भारत या वीर सावरकरांच्या संस्थेच्या सहाय्याने रशियन निहिललिस्टांशी संधान बांधून बॉम्ब बनविण्याची विद्या हस्तगत केली.  भारतात परतल्यावर हेमचंद्र दास यांनी पुणे येथे सुरत काँग्रेसच्या अधिवेशनानंतर चित्रशाळेच्या वासुकाका जोशी यांच्या घरी लोकमान्य टिळक व अरविंद घोष यांना या बॉम्बच्या फॉर्म्युल्याचे सादरीकरण करूनही दाखविले होते. डिस्ट्रिक्ट जज किंग्ज फोर्ड हे राजकीय गुन्ह्यांबद्दल अमानुष शिक्षा देत. त्यामुळे जनतेत ते अत्यंत अप्रिय झाले होते. त्यांना धडा शिकविण्यासाठी खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी 30 एप्रिल 1908 यादिवशी मुझफ्फरच्या स्टेशन क्लबमधून किंग्ज फोर्ड परत येत असताना त्यांच्या घराजवळ त्यांच्या गाडीत बॉम्ब टाकला आणि पोबारा केला; पण त्यांच्या दुर्दैवाने त्या गाडीत किंग्ज फोर्ड नसून इंग्रज बॅरिस्टर प्रिंगल केनेडी यांच्या पत्नी श्रीमती केनेडी व मुलगी ग्रेस केनेडी या होत्या. किंग्ज फोर्ड मागच्या गाडीत होता. रंगसादृष्यामुळे त्यांची फसगत झाली होती. दोन निरपराधी ब्रिटिश महिला ठार झाल्या; पण हा बॉम्ब कोणासाठी होता व त्यांचे महत्व काय हे ब्रिटिश सरकार व नागरिक या दोघांच्याही ध्यानात आले. 
 
ब्रिटिश सरकारची दडपशाही
 
ब्रिटिश सरकारने हिंसेचा मुकाबला दडपशाहीने करण्याचे ठरविले व अँग्लो इंडियन वर्तमानपत्रांनी संयम सोडून सरकारच्या बाजूने भरमसाठ लिहिण्यास सुरूवात केली. 8 जून 1908 रोजी सरकारने ’द इक्स्पलोसिव्ह सब्स्टनसेस क्ट’ व ’न्यूज पेपर (इन्साइटमेंट टू ऑफेन्सेस) अ‍ॅक्ट’ असे दोन दडपशाहीचे कायदे अंमलात आणले. इंडियन पिनल कोडच्या 124 अ व 153 अ कलमाखाली अनेकांवर खटले भरण्यात येऊन त्यांना कडक शिक्षा सुनावण्यात आल्या. यावेळी अँग्लो इंडियन वर्तमानपत्रांनी जी बेताल व विखार टीका केली, तिला उत्तर देणारा अग्रलेख लोकमान्य टिळक यांनी 24 जून 1908 च्या केसरीत ’देशाचे दुर्दैव’ या शीर्षकाखाली लिहिला आणि त्यासाठी त्यांना 26 जून 1908 रोजी अटक झाली. पुढे केसरीतील ’हे उपाय कायमचे नव्हेत’ या शीर्षकाखालील लेखही राजद्रोहात्मक ठरविला. या दोन्ही लेखांमुळे क्रांतीकारक स्वातंत्र्यसैनिकांचे लोकमान्य टिळक मसीहा व आदर्श बनले. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी भारत मंत्री लॉर्ड मोर्ले यांना लिहिले, लोकमान्य टिळक हे भारतातील ब्रिटिश सरकारविरुद्धचे प्रमुख कटवाले आहेत. ब्रिटिश राजसत्ता उलथून पाडण्याचे ध्येय लोकमान्य टिळक यांचे आहे असा त्यांच्यावर गुन्हा ठरविण्यात आला. टिळकांना जामीनकीचा अर्ज करता येऊ नये म्हणून वॉरंट बजाविण्यात मुद्दामच दिरंगाई करण्यात आली. 2 जुलै 1908 रोजी बॅ. महंमद अली जीना यांना न्या.दावर जे पूर्वीच्या 1897 च्या खटल्यात टिळकांचे वकील होते व जामीन मिळवून दिला होता, त्यांनीच जामीनकीचा अर्ज फेटाळला.
 
13 जुलै रोजी खटल्याच्या सुनावणीस सुरुवात होऊन 22 जुलैला खटल्याचा निकाल लागून 7 विरुद्ध 2 मतांनी टिळकांना दोषी ठरविण्यात आले. टिळकांनी आपल्या बचावासाठी 5 दिवसात 21 तास भाषण केले. शिक्षा सुनावताना न्या. दावर आपल्या क्षूद्र मनोवृत्तीचे प्रदर्शन करताना म्हणाले... ‘तुमचे केसरीतील लेख राजद्रोहाचे असून हिंसेला मान्यता देणारे तसेच बॉम्बचा उपयोग करण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. या देशात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी तुम्हाला हद्दपार करण्यात येत आहे. हद्दपारीची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांची रवानगी सहा वर्षे मंडाले येथे करण्यात आली. 8 जून 1914 रोजी तिथून त्यांची मुक्तता होऊन ते पुण्यात परतले. 
 
ज्या दिवशी टिळक यांना शिक्षा जाहीर झाली त्याच्या दुसर्‍या दिवशी 23 जुलै 1908 रोजी टिळकांच्या 52 व्या जन्मदिनी अटकेच्या निषेधार्थ पुणे शहरात हरताळ पाळण्यात आला, तर मुंबईच्या गिरणी कामगारांनी उत्स्फूर्तपणे संप केला. त्या काळात कामगार संघटीत नव्हते आणि त्यांची युनियनही नव्हती. लोकमान्य टिळक यांना हद्दपारीची सहा वर्षाची शिक्षा झाल्याचे रशियन क्रांतीचे नेते कॉम्रेड लेनिन यांना कळताच ते म्हणाले, जुलमी राजवटीविरुद्ध भारतीय जनतेत जागृती होत असल्याचे हे द्योतक आहे. स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक यांना दोन्ही वेळा झालेल्या तुरुंगवासाच्या शिक्षा या क्रांतीकारकांना देत असलेल्या सहकार्याबद्दलच झाल्या. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत क्रांतीकारकांचे आदर्श हे लोकमान्य टिळकच होते.
 
अन्यायाविरूद्ध बंड
 
भारतीय स्वातंत्र्यलढा हा केवळ याचना, अर्ज आणि सुधारणा यांचा इतिहास नव्हता. तो ज्वालाग्रही असंतोषाचा, अन्यायाविरुद्धच्या उघड बंडाचा आणि राष्ट्राच्या पुर्नजन्माचा इतिहास होता. या ज्वालामुखीला चेतना देणारे, त्याला विचारांचे इंधन पुरवणारे आणि जनतेच्या मनात स्वराज्याची तडक निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणूनच लोकमान्य टिळक यांची भारताच्या इतिहासात नोंद आहे. लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी राजकारण केले. विचार मांडत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी पिढ्या पेरल्या. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा घोष गुलाम भारताच्या आत्म्याचा उद‍्गार होता. लोकमान्य टिळक यांनी ’केसरी’ आणि ’मराठा’ या वृत्तपत्रांतून ब्रिटिश सत्तेवर निर्भीड प्रहार केले. त्यांच्या लेखनात तडफ होती, तत्वज्ञान होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे क्रांतीकारकांना संघर्ष करण्यासाठी उर्मी होती. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी लोकांच्या मनात जी भिती होती, ती संपविण्याचे काम टिळक यांनी केले. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे केवळ धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हते, तर प्रत्यक्षात राष्ट्रनिर्मितीच्या कार्यशाळा होत्या. शिवाजी महाराजांच्या स्मृतीतून त्यांनी विशेषतः तरुण पिढीवर स्वराज्य, स्वाभिमान आणि शौर्य यांचे संस्कार घडविले. या उत्सवामध्ये गायले जाणारे पोवाडे, देशभक्तीपर गीते आणि घोषवाक्ये ही तरुणांच्या मनात क्रांतीची बीजे रोवणारी ठरली. उठा, जागे व्हा, शिवबाच्या राज्यातील तरुणांनो अन्याय सहन करू नका, अशा आशयाच्या अनेक गीतरचना या काळात निर्माण झाल्या. लोकमान्य टिळकांच्या लेखणीची ब्रिटिशांना भीती वाटत होती कारण ती लेखणी तलवारीपेक्षा धारधार होती टिळकांनी स्पष्टपणे सांगितले कि, अन्यायाविरुद्ध उठणे हे अधर्म नाही तर कर्तव्य आहे. याच विचारांपासून प्रेरणा घेऊन विविध क्रांतीकारी संघटना उभ्या राहिल्या.
 
गदर चळवळ
 
लोकमान्य टिळक यांचे सहकारी पांडुरंग सदाशिव खानखोजे हे अमेरिकेत गेले आणि अमेरिकेतील भारतीयांनी 1913 मध्ये गदर चळवळ सॅन फ्रान्सिस्को येथे गदर संघटनेच्या माध्यमातून चालू केली. पांडुरंग खानखोजे, लाला हरदयाळ, सोहन सिंह भकना, करतार सिंह सराभा, पंडित काशीराम, भाई परमानंद, विष्णु गणेश पिंगळे आणि इतर क्रांतीकारकांनी परदेशात राहून ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठावाची तयारी केली, गदर चळवळ हे भारतीय क्रांतीच्या इतिहासातील अतिशय जहाल पर्व आहे. गदर या शब्दातच बंड, उठाव आणि उलथापालथ यांची गर्जना आहे. या चळवळीतील पत्रके, गीते आणि घोषणांमध्ये मातृभूमीवरील प्रेम, गुलामगिरीचा तिरस्कार आणि बलीदानाची तयारी अशा भावना प्रखरतेने व्यक्त झाल्या. गदर की गुंज या गदर च्या स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या कविता संग्रहात हूँदराज दुखायल यांची सिंधी भाषेत कविता आहे ज्यामध्ये लोकमान्य टिळकांचा उल्लेख आहे. या कवितेतील एका कडव्यामध्ये त्यांनी असे म्हंटले आहे
 
मादरे हिन्दु जो अजु कीन सूंहें थो मस्तक! रोजु मुल्कनि में मतो हाइ तिलक, हाइ तिलक! 
बाग भारत मां गुलनि जो ही उड़ामी वियो कंटक, 
जुल्म थी जुल्म मथां तुंहिंजो रहियो आहे फलक, 
तुंहिंजी तस्वीर फिरे हिन्द जे नेणनि में सदा, 
तुंहिंजी तमसील तिलक देस दुखिये लाइ दवा।
याचा मराठीत अर्थ असा
आज भारतमातेचे मस्तक तुझ्यामुळे उंच झाले आहे, 
आज देशाच्या कानाकोप-यात टिळक-टिळक असा जयघोष होतो आहे 
भारतरूपी बागेत फुललेल्या गुलाबांना जणू एक काटा मिळाला, 
तुझ्यावर झालेले अन्याय काळाच्या प्रवाहातही टिकून राहिले नाहीत, 
भारताच्या नजरेत तुझी प्रतिमा सदैव जिवंत राहील, 
टिळकांची मूर्ती या देशदुखी जनांसाठी जणू औषधच आहे. 
 
सशस्त्र प्रतिकार
 
बंगालमधील क्रांतीकारकांवर टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. बंगालमध्ये ’अनुशीलन समिती’ आणि ’युगांतर’ सारख्या संघटनांनी सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग स्वीकारला. अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल आणि बाघा जतीन यांसारख्या नेत्यांनी या चळवळींना दिशा दिली. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हे गीत रामप्रसाद बिस्मिलाशी जोडले गेले आहे.त्यामागची बलीदानाची वृत्ती लोकमान्य टिळक काळातील जहाल वातावरणातूनच अधिक बळकट झाली. लोकमान्य टिळकांनी तयार केलेली राजकीय-मानसिक जमीनच पुढील सशस्त्र राष्ट्रवादाला पोषक ठरली. भारतीय  राष्ट्रवादाच्या निर्णायक टप्प्याचे लोकमान्य टिळक प्रतिनिधी होते, जिथे वैचारिक जागृती, जनसंघटन आणि क्रांतीकारक उर्मी यांचा संगम झाला. त्यांच्या प्रभावामुळेच स्वातंत्र्यलढ्याला अर्ज-विनंतीच्या चौकटीतून बाहेर पडून संघर्ष, स्वाभिमान आणि बलीदानाची भाषा मिळाली. लोकमान्य टिळक हे जहाल राष्ट्रवादाच्या इतिहासातील अपरिहार्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी स्वराज्याचा घोष दिला, जनसंघटनाची नवी शैली घडविली आणि क्रांतीकारी संघटनांना वैचारिक प्रेरणा पुरवली. लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले आणि टिळक युग संपुष्टात येऊन गांधी युगाची सुरवात झाली.लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्रलढ्याचा पाया घातला तर महात्मा गांधी यांनी त्यावर कळस चढवीला.
 
लोकमान्यांना श्रद्धांजली वाहताना महात्माजींनी ’यंग इंडिया’त लिहिले : लोकमान्य दिवंगत झाले, यावर विश्‍वास ठेवणे कठीण आहे. ते जनतेचा अविभाज्य घटक होते. आजच्या कोणत्याही नेत्याचा त्यांच्याइतका जनतेवर प्रभाव नाही. त्यांनी आपल्या देशबांधवांची जी श्रद्धा संपादन केली होती, ती असामान्य होती. ते निःसंशय जनतेचे दैवत होते. त्यांचा शब्द म्हणजे हजारोंना कायदा वाटे. आपल्यातील एका महापुरुषाचे आज पतन झाले आहे. सिंहगर्जना लुप्त झाली आहे. (giant among men has fallen. The voice of the lion is hushed.) त्यांचा देशबांधवांवर इतका प्रभाव असण्याचे कारण काय? मला वाटते याचे उत्तर साधे आहे. देशभक्ती त्यांच्या रक्तात भिनली होती. देशभक्तीशिवाय त्यांना दुसरा धर्म माहीत नव्हता. ते जन्मजात देशभक्त होते.
 
लोकमान्यांनी हिरीरीने बहुसंख्याकांच्या राजवटीचा पुरस्कार केला. त्यामुळेच त्यांचा जनतेवर प्रभाव होता. ते पोलादी वृत्तीचे होते आणि त्याचा त्यांनी मातृभूमीसाठी उपयोग केला. त्यांचे जीवन म्हणजे उघडे पुस्तक होते. त्यांच्या आवडीनिवडी साध्या होत्या. त्यांचे खासगी जीवन अगदी निष्कलंक होते. त्यांना लाभलेल्या ईश्वरी देणगीचा त्यांनी देशासाठी वापर केला. लोकमान्यांइतक्या सुसंगतपणे व आग्रहाने स्वराज्याचा मंत्र इतर कोणीच अधोरेखित केला नाही.भावी पिढ्या त्यांच्याकडे अर्वाचीन भारताचे प्रणेते म्हणून पाहतील. आपल्यासाठी जगलेले व प्राणार्पण केलेले महापुरुष म्हणून जनता त्यांच्या स्मृतीचे जतन करील.
 
अभिनव भारत
 
महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये ’अभिनव भारत’ची स्थापना केली. या संघटनेने सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. सावरकरांनी स्वतः टिळकांना आपले वैचारिक गुरु मानले होते. त्यांच्या लेखनात आणि भाषणांत टिळकांच्या राष्ट्रवादाची छाया स्पष्ट दिसते. स्वातंत्र्ययोद्धे पंडित गेंदालाल दीक्षित हे असे जहाल क्रांतीकारक होते की, ज्यांनी ब्रिटीशांना इतके चकवले की, ते गोंधळून गेले आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ते ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रजागरण या विचाराने जो राजकीय अर्थ दिला तो पंडित गेंदालाल दीक्षितांच्या क्रांतीकारी विचारांना पोषक ठरला. शिवाजी महाराजांचा इतिहास, सार्वजनिक उत्सव आणि देशभक्तीच्या सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करून जनमानस जागृत करण्याची लोकमान्य टिळकांची पद्धत याची पंडित गेंदालाल दीक्षितांनी प्रेरणा घेऊन उत्तर भारतातील क्रांतीकारी चळवळीचे संघटन त्यांनी केले. ‘शिवाजी समिती’ आणि त्यानंतर ’मातृवेदी’ संघटना या माध्यमातून क्रांतीकारी युवकांचे जाळे त्यांनी उभारले. शस्त्रसज्ज बंडाची कल्पना, गुप्त संघटनात्मक पद्धती आणि बलीदानाची तयारी ही ’मातृवेदी’ संघटनेची खास वैशिष्ट्ये होती. पंडित रामप्रसाद बिस्मिल, मुकुंदीलाल गुप्त यांनी ’मातृवेदी’ संघटनेत स्वातंत्र्यलढ्याची दीक्षा घेतली होती. टिळकांनी स्वराज्य याची संघर्ष आणि स्वाभिमान अशी जी भाषा तयार केली तीच भाषा पुढे क्रांतीकारक संघटनांच्या नोंदीमध्ये, गीतांमध्ये आणि शपथविधी मध्ये ऐकू येते. टिळक आणि स्वातंत्र्यलढ्यातील जहाल गाणी यांचे नाते विशेष महत्वाचे आहे. ’वंदे मातरम’ हे गीत आधीच राष्ट्रवादी असंतोषाचे प्रतीक बनले होते. लोकमान्य टिळकांनी या गीताला जनमानसात प्रत्यक्ष कृतीशी जोडले.

Related Articles