लोकमान्यांची मंडाले तुरुंगातून पाठविलेली पत्रे   

(पत्रलेखन कालावधी 1908 ते 1914)

प्रा. सुबोध अनंत जोशी, सांगली 
 
लोकमान्य टिळकांच्या सहा वर्षांच्या तुरुंगवासाची सामाजिक, राजकीय पार्श्‍वभूमी समजावून घेणे आवश्यक आहे. भारतीयांची स्वातंत्र्याची उर्मी दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश सत्ताधीशांनी अनेक डावपेच लढवले. त्यातील एक होता Divide and Rule. जात, धर्म, प्रांत या आधारावर भारतीयांच्या मनात विषवल्ली पेरणे, त्यांच्यात फाटाफूट करणे अशी ही कपटनीती होती. अखंड बंगालची फाळणी करणे हा त्या कपटनीतीचाच भाग होता.19 जुलै 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा केली गेली आणि त्यानंतरच भारतभर ब्रिटिश सत्तेविरुद्धचे आंदोलन तीव्र झाले. लोकमान्य टिळक हे याबाबतीत आघाडीवर राहिले. खर्‍या अर्थाने ते भारतीय असंतोषाचे जनक होते. ब्रिटिशांच्या कपटनीतीला उत्तर म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. 
 
स्वदेशी माल वापरण्याचा आक्रमक प्रचार त्यांनी केला आणि त्यासाठी स्वदेशी बझार स्थापन केला. ही लोकचळवळ खूपच प्रभावी ठरली. ब्रिटिशांच्या विरुद्ध उफाळलेला असंतोष शिगेला पोहोचला. त्याचाच परिणाम म्हणजे खुदीराम बोस याने चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याचेवर एप्रिल 1908 मध्ये केलेला बाँबहल्ला. टिळकांनी ‘केसरी’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात अशा क्रांतिकारी कृत्यांचे समर्थन केले आणि त्याबद्दल ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला जबाबदार धरले. या लेखांबद्दल टिळकांवर खटला भरला गेला. राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यासाठी न्यायमूर्ती डावर यांनी त्यांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आणि त्यांना मंडाले तुरुंगात पाठवण्यात आले. ज्या आठ लेखांसाठी टिळकांना शिक्षा झाली त्यातील पाच लेख त्यांचे सहकारी प्रसिद्ध नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिले होते. ही गोष्ट टिळकांनी उघड केली नाही. सर्व लेखांची जबाबदारी स्वतःवर घेतली.
 
टिळकांनी प्रामुख्याने पुढील सहाजणांना मंडाले जेलमधून पत्रे लिहिली.
 
1) धोंडोपंत विद्वांस - हे टिळकांचे भाचे होते. ते केसरी आणि मराठा वृत्तपत्रांचे व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. टिळकांचे ते अत्यंत विश्‍वासू सहकारी होते.
2) दादासाहेब खापर्डे - हेही टिळकांचे जवळचे सहकारी होते. खापर्डेंनी टिळकांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांनी मंडालेला जाऊन टिळकांची भेट घेतली होती.
3) दाजी आबाजी (दाजीसाहेब) खरे - व्यवसायाने वकील असणार्‍या खरे यांची टिळकांशी मैत्री होती. कोल्हापूरच्या ताईमहाराज खटल्यात त्यांनी टिळकांना खूप साहाय्य केले.
4) बापू आणि रामभाऊ - टिळकांची ही मुले टिळक तुरुंगात असताना शाळकरी वयाची होती. अर्थातच त्यांना लिहिलेली पत्रे कौटुंबिक स्वरूपाची आहेत. ही सर्व +पत्रे लोकमान्य टिळकांनी मंडाले तुरुंगात इंग्रजीत लिहिली आहेत. इंग्रजीतच पत्रलेखन करण्याचे बंधन ब्रिटिशांनंीं घातले होते.
 
कर्तव्य तत्परता
 
कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे, स्वच्छपणे बोलणे, लिहिणे हा टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू, त्यांच्या तुरुंगातून लिहिलेल्या पत्रलेखनात ठळकपणे दिसतो. दादासाहेब खापर्डे हे त्यांचे निकटचे अनुयायी होते. टिळकांनी तुरुंगातून सुटका करून घेण्यासाठी ब्रिटिश सत्ताधीशांची काही बाबतीत तडजोड करावी, तुरुंगाबाहेर आल्यावर कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेणार नाही, असे लिहून द्यावे असे खापर्डे यांचे मत होते आणि टिळकांना पत्र लिहून त्यांनी तसे त्यांना सुचविले होते; परंतु टिळकांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यांनी खापर्डेंना लिहिले, ‘तसं मी केलं तर आजवर आयुष्यात जे केलं त्यावर पाणी टाकल्यासारखं होईल. लोकांसाठी मी माझं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. फक्त माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी कधी जगलो नाही.’ (मूळ पत्र इंग्रजीत आहे.)
 
टिळकांच्या मुलांकडे एक सायकल होती. त्यांना आणखीन एक सायकल विकत घ्यावयाची होती. टिळकांनी बापू आणि रामभाऊ या आपल्या मुलांची मागणी नाकारली. त्यांनी लिहिले, ‘सायकल ही चैन आहे. लांब अंतरासाठीच ती आवश्यक आहे. ’(A bicycle is a luxury - being necessary only for long distance) टिळकांनी मैत्री किंवा नातेसंबंध याबाबतीतदेखील अकारण, अवाजवी भावुकता दाखवली नाही.सचोटी, प्रामाणिकपणा याबाबतीतही टिळक आदर्शवत् होते. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या देखभालीच्या जबाबदारीसाठी जो ट्रस्ट स्थापन केलेला होता, त्याचे टिळक ट्रस्टी होते. या देखभालीच्या खर्चासंबंधी पत्र लिहून ते काटेकोर सूचना करतात. सार्वजनिक खर्च करताना पैशाची उधळपट्टी होता कामा नये असे ते लिहितात.
 
कर्मयोगाला प्राधान्य
 
गीतारहस्य लिहून टिळकांनी कर्मयोग या संकल्पनेला प्राधान्य दिले होते. प्रत्यक्ष जीवनात, तुरुंगातही ते कर्मयोगीच राहिले. कर्मयोग्याची स्थितप्रज्ञता त्यांनी अंगी बाणविली होती. प्रीव्ही कौन्सिलकडे केले गेलेले त्यांचे अपील फेटाळले गेले आणि टिळकांची तुरुंगातून मुक्तता होण्याची शक्यता मावळली. ही गोष्ट खूप निराशाजनक होती; परंतु टिळकांनी हा निर्णय स्थितप्रज्ञतेने स्वीकारला. त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं, ‘मित्राने जे करणे शक्य आहे ते तू केलंस. आता आपण सर्व गोष्टी आपल्या नशिबावर सोडून देऊ.’ त्यांची पत्नी सत्यभामाबाई यांच्या मृत्यूची बातमी टिळकांना कळविण्यात आली. आपल्या भाच्याला लिहिलेल्या पत्रात त्या परिस्थितीला शांतपणे सामोरे जाण्यास आणि त्यांच्या मुलांची काळजी घेण्याविषयी ते सांगतात. टिळकांची ही कर्मयोगातील स्थितप्रज्ञता त्यांच्या सार्वजनिक जीवनात तसेच त्यांच्या कौटुंबिक जीवनातही दिसून येते.लोकमान्य टिळक हे विद्वान, राजकीय नेते, जहाल लेखन करणारे पत्रकार, संपादक म्हणून परिचित आहेत. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
 
‘गीतारहस्य’ लिहून भगवद् गीतेचे आधुनिक भाष्यकार अशीही त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर ते एक उत्तम प्रशासक होते, याची माहिती त्यांचा पत्रव्यवहार वाचल्यावर होते. काही पत्रे त्यांनी आपल्या भाच्याला धोंडोपंत विद्वांस यांना लिहिली आहेत. विद्वांस हे केसरी आणि मराठा वृत्तपत्रांचे व्यवस्थापक होते. टिळकांनी लिहिलेल्या काही पत्रात ते या वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनेविषयी सविस्तर सूचना करतात. वृत्तपत्रात कोणत्याही घटनेचे वार्तांकन करताना पूर्णपणे वास्तवाचा आधार घ्यावा, कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. वार्तालेखन करताना कोणाचाही गैरसमज होणार नाही याची खबरदारी घ्यावी. फायनल प्रुफ कमीत कमी दोघाजणांनी तपासावे, अशा सूचना त्यांनी ते 1 मार्च 1910 या दिवशी विद्वांस यांना लिहिलेल्या पत्रात दिलेल्या आहेत.
 
टिळकांना औद्योगिक जगाबद्दल खूप माहिती होती. नवनवीन उद्योगांचे तंत्रज्ञान जाणून घ्यायला ते उत्सुक होते. साने नावाच्या मराठी माणसाने बर्लिन विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पीएच.डी. मिळवल्याबद्दल ते एका पत्रात आनंद व्यक्त करतात. त्यांनी जर्मनीतील उद्योगाबद्दल सविस्तर माहिती घ्यावी आणि तशा प्रकारचे उद्योग भारतात सुरू करावे, असे ते एका पत्रात सुचवितात. त्या संदर्भात त्यांचे चरित्रलेखक टी. एन. पर्वते लिहितात. ‘टिळकांनी स्वदेशी ही संकल्पना प्रचलित केली, त्यामागे त्यांचे उद्यमशीलतेविषयीचे प्रेम आहे.’
 
कायद्याचे सखोल ज्ञान
 
टिळकांनी कोर्टात प्रॅक्टिस केली नाही; परंतु त्यांचे कायद्याचे ज्ञान सखोल होते. त्यांना अनेक खटल्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे कायद्याच्या खाचाखोचा त्यांना माहीत झाल्या होत्या. दादासाहेब खापर्डे यांना लिहिलेल्या पत्रात ते प्रीव्ही कौन्सिलकडे त्यांना दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करताना, देशद्रोहाबद्दल शिक्षा झालेल्या ओ कोनेलचा संदर्भ देण्यास सांगतात. आपल्यावर भरलेल्या खटल्यात शासनाने केलेली ज्युरींची निवड चुकीची आहे आणि ती प्रीव्ही कौन्सिलच्या निदर्शनास आणावी, असे ते एका पत्रात सुचवितात. एकापेक्षा अधिक आरोप एकाच कलमाखाली आणणे (Joinder of charges) कायद्याच्या दृष्टीने काही अपवाद वगळता चुकीचे आहे आणि तसे केले तर सुटका होण्याची शक्यता दुरावते, असे ते नमूद करतात. कायद्याच्या अभ्यासाने टिळकांची विचार करण्याची पद्धत अत्यंत तर्कशुद्ध झालेली दिसते. ते लिहितात, ‘जर माझी सुटका कायदेशीर मार्गाने होत नसेल तर हा विषय थांबवावा. कोणतीही किंमत देऊन सुटका करून घेणे मला नको आहे. मित्रप्रेमाने हा विषय पुढे रेटू नये अशी माझी विनंती आहे.’
 
ध्यास वाचनाचा, अभ्यासाचा
 
लोकमान्य टिळकांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचे स्पष्ट, पारदर्शक प्रतिबिंब त्यांच्या पत्रलेखनात पडलेले दिसते. राजकीय कैदी असल्याने त्यांना मंडाले तुरुंगात पुस्तके मागवून घेण्याची परवानगी दिली होती. आपल्या पत्रात ते त्यांना वाचायची इच्छा असलेल्या पुस्तकांची यादी देतात. विविध विषयांवरील या पुस्तकांच्या यादीत ते मॅक्समुल्लरचे अनुवादित उपनिषद, एडमंड वर्कचे निवडक साहित्य, तुकारामांची गाथा अशा अनेक पुस्तकांचा समावेश करतात. तत्त्वज्ञान, विज्ञान, अध्यात्म हे त्यांच्या आवडीचे विषय. या विषयावरची पुस्तके ते मागवितात. आपल्या वाचनाविषयी ते लिहितात, ‘नुकतेच मी वेबरचे नक्षत्रावरचे पुस्तक वाचले. या पुस्तकाने मला किती समाधान मिळाले याची तुम्हाला कल्पना येईल.’ एका पत्रात ते ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे लेखन पूर्ण केल्याचे लिहितात. त्या संदर्भात ते लिहितात, ‘भगवद्गीता ही नैतिकतेच्या प्रश्‍नावरचे भाष्य आहे.’
 
कोणत्याही गोष्टींचा सविस्तर अभ्यास करणे, त्यासाठी खूप परिश्रम आणि मुख्य म्हणजे अभ्यासाचे बाबतीत काटेकोर शिस्त पाळणे, याबाबतीत टिळक खूप जागृत होते. आपला मुलगा रामभाऊ परीक्षेत नापास झाल्याचे समजल्यावर टिळकांना कमालीचे दुःख झाले. आपल्या मुलाला ते एका पत्रात लिहितात की मॅट्रिक्युलेशन ही परीक्षा ही पुढील सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्याचे प्रवेशद्वार आहे आणि त्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. रामभाऊला, लिहिलेल्या पत्रात ते अभ्यास करण्याची रास्त सूचना करतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्याची कानउघडणी करतात. ते लिहितात, ‘मी तुमच्यासोबत नाही म्हणून मूर्खासारखे वागू नका. या गोष्टी समजण्याएवढे तू आणि बापू दोघेही मोठे आहात. लक्ष केंद्रित करायला शिका. परिश्रम करा आणि अभ्यासाच्या विषयावर प्रभुत्व मिळवा आणि मग तुम्हाला आनंद मिळेल. एकदा ही सवय आत्मसात केली की ती कायमची राहील.’
 
आपल्या मुलांना शिकविण्यासाठी टिळकांनी कावडे या खासगी शिक्षकांची नेमणूक केली होती. या शिक्षकांना ते स्वतंत्र पत्र लिहितात आणि आपल्या मुलांना कसे शिकवावे याविषयी सविस्तर सूचना देतात. मुलांना वरचेवर प्रश्‍न विचारावे, संबंधित विषयावर त्यांच्याशी चर्चा करावी, शक्यतो विषय मराठीत समजावून सांगावे, मुलांमध्ये संबंधित विषयांची गोडी निर्माण करावी, घोकंपट्टीपेक्षा, समजून घेण्यावर भर द्यावा अशा सूचना ते करतात. स्वतः टिळकांनीही नवीन भाषा शिकण्याचा ध्यास घेतला होता. फ्रेंच, जर्मन भाषा शिकण्यास प्रारंभ केल्याचे त्यांनी लिहिले आहे. ह्युगोचे ‘ऋीशपलह ॠीराारी डळाश्रिळषळशव’ हे पुस्तक फ्रेंच शिकण्यास उपयोगी पडल्याचा उल्लेख त्यांनी एका पत्रात केला आहे. 1908 ते 1914 या कालावधीत ब्रह्मदेशाच्या मंडाले तुरुंगातून आपल्या मुलांना आणि सहकार्‍यांना लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या या पत्रातून त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसून येतात. चरित्रकारांना, अभ्यासकांना ही पत्रे अत्यंत मौलिक ठरू शकतील.
 
संदर्भ - समग्र लोकमान्य टिळक खंड - सातवा. पुणे केसरी प्रकाशन (1975)

Related Articles