दहाव्या दिवशी पदकांची लयलूट   

आठ सुवर्णपदकांची कमाई

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 
 
ग्लासगो : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या दहाव्या दिवशी भारताने विक्रमी कामगिरी करत तब्बल आठ सुवर्णपदके जिंकली. यापैकी सात सुवर्णपदके बॉक्सिंगमध्ये, तर एक सुवर्ण पॅरा अ‍ॅथलेटिक्समधील शॉटपुटमध्य मिळाले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात एका स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सात सुवर्णपदके जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली.
 
महिला बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जैस्मिन लांबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया घंघास आणि अरुंधती चौधरी यांनी आपल्या-आपल्या अंतिम सामन्यांत विजय मिळवत सुवर्णपदके पटकावली. पुरुष गटात सचिन सिवाच आणि अंकुश पंघाल यांनीही सुवर्णपदकांवर नाव कोरले. याच स्पर्धेत लव्हलिना बोरगोहेन, जादुमणी आणि नरेंद्र बेरवाल यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सोमन राणा यांनी शॉटपुटमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंग याने कांस्यपदकाची कमाई केली. यासह तो राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात 5000 मीटर आणि 10,000 मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय धावपटू ठरला.अ‍ॅथलेटिक्समधील तिहेरी उडी (ट्रिपल जंप) स्पर्धेतही भारताने आणखी दोन पदके जिंकत पदकतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम केले.
 
अंकुश पंघालचा दमदार खेळ
 
पुरुषांच्या 80 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अंकुश पंघालने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा 4-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच अंकुशने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले आणि अखेर एकतर्फी विजय मिळवला.
 
सचिन सिवाचच्या अखेरच्या पंचने ठरवले सुवर्ण
 
पुरुषांच्या 60 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सचिन सिवाचने नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग नडेवेलोवर 3-2 अशी रोमांचक मात करत सुवर्णपदक जिंकले. दुसर्‍या फेरीत रेफरींनी सचिनला एका गुणाची शिक्षा दिल्यामुळे त्याच्यावर दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे अखेरच्या फेरीत निर्णायक कामगिरी करणे त्याच्यासाठी आवश्यक होते. शेवटची फेरी अत्यंत चुरशीची झाली; मात्र अखेरच्या क्षणी सचिनने लगावलेल्या जबरदस्त पंचमुळे नडेवेलो डगमगला आणि त्याच निर्णायक फटक्याने सचिनच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब झाले. 

Related Articles