रावणाची हनुमानापासून माघार   

भावार्थ रामायणातील कथा , विलास सूर्यकांत अत्रे 

रावण आपल्या शूरवीर योद्ध्यांसह युद्धाला येत असल्याचे पाहून, रामाने लक्ष्मणाला आपल्या धनुष्यबाणासह सज्ज होण्यास सांगितले. रावणाने शरवर्षावाने वानरसैन्यात हलकल्‍लोळ माजविला. ते पाहून सुग्रीवाला चेव चढला. रावणाशी युद्ध करण्याच्या उद्देशाने त्याने अनेक शिळा असलेला एक पर्वत शिखर उपटून रावणावर फेकला. आकाशातून कोसळणारे, ते जीव घेणे संकट पाहून रावणाने त्या शिळांचा नाश करण्यासाठी असंख्य बाणांचा वर्षाव केला. पण ते शिखर अती विशाल होते. रावणाच्या या बाणवर्षावाने ते थोडेसुद्धा भंगले नाही. त्यामुळे रावण सावध झाला आणि ब्रह्मदेवाने वर दिलेला ब्रह्मवरद बाण रावणाने त्या शिखरावर सोडला. त्या ब्रह्मवरद बाणामुळे त्या शिखराचे शतश: तुकडे झाले. 
 
रावणावर आलेले संकट दूर झाले होतेे. सुग्रीवाचा हा हल्‍ला रावणाने परतवून लावला होता, त्यामुळे सुग्रीवाला राग आला. चिडून जाऊन सुग्रीवाने रावणावर परत हल्‍ला चढवला. या हल्ल्याला रावणानेही तसेच उत्तर देऊन तो परतवून लावला. या हल्ल्यांमुळे सुग्रीवाच्या पुढे आपला निभाव लागणार नाही असे    रावणाला वाटले. सुग्रीवाच्या हातून आपली सुटका करून घ्यायची आणि त्याचा बंदोबस्त करायचा तर, एखाद्या दुसर्‍या ब्रह्मवरद बाणाचाच प्रयोग केला पाहिजे असे त्याच्या लक्षात आले. रावणाने त्याला प्राप्त असलेल्या दुसर्‍या ब्रह्मवरदबाणाचा सुग्रीवावर निशाणा साधला. हा ब्रह्मवरद बाण सुग्रीवाच्या हृदया जवळ लागला. ब्रह्मवरद बाण असल्यामुळे त्या बाणापुढे सुग्रीवाचे काही चालले नाही. 
 
सुग्रीवाचे रक्षण
 
सुग्रीव मूच्छिर्र्त होऊन जमिनीवर पडला. युद्ध करताना सुग्रीवाचे रामस्मरण सतत चालू होतेच. मूच्छिर्र्त होऊन जमिनीवर पडताना त्याने रामाच्या नावाने पुकारा केला. रावणाच्या बाणांनी सुग्रीव पडल्याचे पाहून राक्षस सैन्यात आनंदाच्या लहरी उठल्या. सुग्रीव म्हणजे किष्किंधेचा महापराक्रमी राजा, रामाचा उजवा हात त्या सुग्रीवाला रावणाने आडवे केले होते. रावणाला यश मिळाले होते. ते पाहून आनंदाने बेभान झालेली राक्षस सेना रावणाच्या नावाने जोरजोरात जयजयकार करू लागली. नाचू लागली, झेंडे उडवू लागली. जमिनीवर पडलेल्या सुग्रीवाला बंदी करण्यासाठी रावण, त्याचे निशाचरपुढे सरकले आणि सुग्रीवाला रथात घालून नेण्याचा प्रयत्नात ते होते. सुग्रीव मूच्छिर्र्त पडल्याचे पाहून, सर्व वानरसेना क्षणभर भयभीत झाली. त्यांना निशाचरांची धास्ती वाटली. ते हवालदिल झाले. मात्र सुग्रीवाला बंदी करून नेण्याचा प्रयत्न रावण करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 
 
राम युद्धास सज्ज
 
आपल्या राजाला रावणाने बंदी करू नये अशी वानरांची तीव्र भावना झाली. सुग्रीवाचे रक्षण करण्यासाठी चारी दिशांनी वानरांनी सुग्रीवाला घेरले आणि रावणाच्या रथाला सगळीकडून वेढा घातला. या सामान्य वानरांनीही जीवाच्या आकांताने रावणावर हल्‍ले करण्यास सुरुवात केली. रावणानेही या वानरांना आपल्या बाणांनी जर्जर केले, गदेने दूर उडविले. रावण त्यांच्या जीवावरच उठला होता. वानरांची स्थिती पाहून, गज, गवाक्ष, गवय, मैंद, द्विविद, अशा सर्व वानरवीरांची दुसरी फळी पुढे सरसावली. त्यांनीही रावण आणि निशाचरांवर चालून जाऊन पाषाण, शिळा, वृक्ष, अशा आपल्या शस्त्रात्रांनी जोरदार हल्‍ला सुरू केला. ते रावणावर आणि निशाचरांवर तुटून पडले. रावणानेही तोडीस तोड असे त्यांना उत्तर दिले. रावणाच्या शरवर्षावाने, गदा प्रहराने अनेक वानर, त्यांचे श्रेष्ठी, वीर घायाळ होत होते. या नव्याने पुढे आलेल्या फळीतील वानरश्रेष्ठांचेही रावणापुढे काही चालेनासे झाले. रावण आपल्याला भारी पडत आहे हे पाहून काही वानरवीर रामाला शरण आले. रामाशिवाय आता कोणताच आधार नाही अशी त्यांची भावना झाली होती. समस्त वानरसेनेची स्थिती आणि मन:स्थिती पाहून राम स्वत:च धनुष्यावर बाण सज्ज करीत रावणाशी युद्ध करण्यास निघाला. राम स्वत: युद्धाला निघाल्याचे लक्ष्मणाने पाहिले, तसा लक्ष्मण धावत धावतच रामाजवळ आला. त्याने रामाला विनंती केली की, ’’रामा, आता तू युद्धाला जाऊ नकोस, मी जातो. मी रावणाचा बंदोबस्त करतो आणि वानरांचे भय निवारण करतो. तू फक्त युद्धाला जाण्याची मला अनुमती दे’’. लक्ष्मणाने केलेल्या विनंतीमुळे रामाला संतोष वाटला. रावणाशी कसे युद्ध करावे, काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन त्याने लक्ष्मणाला केले. रावण कपटी आहे, त्याच्यापासून सावध राहण्याची सूचना त्याने लक्ष्मणाला दिली. तसेच मरणाची भीती ज्याच्या मनी असते तो शूरवीर नसतो. तो मृत्यूच्या भयानेच मरतो, असे युद्धभूमीवरील तत्त्वज्ञानही सांगितले. रामाची अनुमती घेऊन लक्ष्मण युद्धाला निघाला. 
 
रावणाचे उग्र स्वरूप
 
लक्ष्मण युद्धाला येण्यापूर्वीच, रावणाने धारण केलेले उग्र रूप, त्याचा अनिवार होणारा शर वर्षाव, त्याने त्रासलेले, गलीतगात्र झालेले वानर आणि वानरांचे सेनानी हनुमानाच्या दृष्टीस पडले, त्यांची अवस्था पाहून हनुमान त्या ठिकाणी धावत गर्जना करीत आला. हनुमानाला येताना पाहून रावणाने त्याला मारण्यासाठी धनुष्यावर बाण सज्ज केला. पण बाण मारण्यासाठी प्रत्यंचा ओढण्याइतकाही अवधी हनुमानाने त्याला दिला नाही. हनुमान धाडकन रावणाच्या रथावर जाऊन आदळला. त्याने एका फटक्यानिशी रावणाचा सारथी लोळवला.रावणापुढे उभा रहात हनुमान रावणाला म्हणाला, ‘’अधर्मी रावणा, तुझा पुरुषार्थ काय आहे ते मला माहीत आहे. माझ्या हाताच्या एका फटक्याने मी तुझा घात करीन’’. त्यावर रावण हसून त्याला म्हणाला, ’’ये चल हनुमाना, या क्षणीच दाखव तुझा पुरुषार्थ मी उभा आहे. माझ्या शरीरावर घाल तुझा घाव, मार तुझा फटका. तू मारलेल्या फटक्यानंतर मी माझा पुरुषार्थ दाखवतो. त्यानंतर मीही तुला एकच फटका मारतो आणि त्या फटक्याने तुझा घात करतो.’’ रावणाचे शब्द ऐकून हनुमानालाही हसू आले. तो रावणाला म्हणाला, ’’अरे तुझा पुरुषार्थ माहीत आहे. साधूच्या वेषात येऊन सीतेचे हरण करणारा तू, कळला तुझा पुरुषार्थ. सीतेचा शोध घेत आलो असताना, तुझा पुत्र अखया याला मीच ठार मारले होते. त्याला मारला तेव्हाच तू मेल्यात जमा झाला आहेस, तुझा पुरुषार्थ तेव्हाच समजला आहे.’’
 
हनुमानाचे शब्द रावणाच्या मनाला विषारी बाणासारखे झोंबलेे. संतापून जाऊन त्याने हनुमानाच्या छातीवर जोरात आपल्या हाताच्या मुठीचा घाव घातला. तो घाव हसत हसत हनुमानाने स्वीकारला आणि आपल्या हाताचा जोरदार फटका रावणाला मारला. त्या फटक्या बरोबर एखादा पर्वत उलथून पडावा तसा रावण भूमीवर जाऊन जोरात आदळला. निपचीत पडला. रावणाच्या प्रारब्धात हनुमानाच्या हातून रावणाचे मरण नसल्याने, मरणपंथी लागलेल्या रावणाच्या जीवात पुन्हा धुगधुगी आली. रावण मेला असेच सगळ्यांना वाटले. लंकेचे दहन करणारा हनुमान, समस्त निशाचरांचा नाश करणारा हनुमान, आणि आता रावणाचा वध करणारा हनुमान, त्याचा पराक्रम, शौर्य, ओज, तेज, बल पाहून सुरवर, ऋषीमुनीं, सिद्धगंधर्व या सगळ्यांनी हनुमानाची स्तुती करायला सुरुवात केली.
 
हनुमानाचे कौतुक 
 
हनुमानाची स्तुती चालू असतानाच रावण पूर्ण शुद्धीत आला, सावध झाला. हनुमान शत्रू असला तरी त्याच्या पराक्रमाने रावण भारावून गेला. न रहावून त्यानेही हनुमानाचे त्याच्या बळाचे कौतुक करण्यास सुरुवात केली. रावण हनुमानाला म्हणाला, ’’हनुमंता तू धन्य आहेस. अतुलनीय बळ असलेला तुझ्या पुरुषार्थाला सीमा नाही. तुझासारखे शौर्य तिन्ही लोकांत कुणाकडे नाही. तुझ्यासारखे बळ इंद्रादी देवांकडेही नाही. दानव आणि मानव तुझ्यापुढे नगण्य आहेत. हे वीरा, तू वीरांचा वीर आहेस. तुला मी मानतो’’. रावणाचे शब्द ऐकताच हनुमान आश्‍चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. रावण जिवंत असल्याचे हनुमानाच्या लक्षात आले. आपल्या बलशाली घावाने रावण मेला अशी हनुमानाची समजूत झाली होती. ती खोटी ठरली होती. रावणाच्या स्तुतीपर शब्दांनी हनुमानाला आपली लाज वाटली. तो रावणाला म्हणाला,’’रावणा माझ्या एका फटक्यात तू मेला नाहीस, आग लागो माझ्या पराक्रमाला. तू मेलास असेच मी समजत होतो, तू तर इथे  सावध होऊन माझ्या पराक्रमाचे कौतुक करीत आहेस. मला माझी आणि माझ्या पराक्रमाची लाज वाटत आहे. माझ्या पुरुषार्थाचा धिक्कार असो’’. हनुमानाच्या शब्दांनी रावण घायाळ झाला. तो हनुमानावर संतापला आणि रागाच्या भरात रावणाने आपल्या वज्रमुठीचा जोरदार ठोसा हनुमानाच्या वक्षावर मारला. अनपेक्षित झालेल्या घावाने हनुमान क्षणभर विचलीत झाला. हनुमानाला मारलेल्या ठोशाने रावणाच्याच हाताला जीवघेण्या झिणझिण्या आल्या. हनुमानाला सामोरे जाणे म्हणजे मरणाला सामोरे जाणे याची त्या क्षणी रावणाला जाणीव झाली. म्हणून रावणाने हनुमाना समोरून पळ काढला आणि त्याने आपला मोर्चा नीळ याच्याकडे वळवला. हनुमान क्षणभरात सावध झाला. त्याने समोर पाहिले तर रावणाने हनुमानाला सोडून दिले होते आणि नीळ त्याच्याशी युद्ध सुरू केले. रावण आणि नीळ या दोघांत युद्ध सुरू झाले होते. दोन वीरांनी एका वीराशी युद्ध करणे हे धर्मयुद्ध नाही. ते पापकर्म आहे म्हणून रावण आणि नीळ आपापसात लढत असताना हनुमानाने स्वत:ला रावणाबरोबर युद्ध करण्यापासून रोखले आणि मोठ्या उत्सुकतेने त्या दोघांचे युद्ध हनुमान पाहू लागला. रावण आणि नीळ यांचे आपापसात जोरदार युद्ध सुरू झाले. नीळाशी युद्ध करताना रावणाला आपला प्रधान सेनापाती प्रहस्ताची आठवण झाली. प्रहस्ताला नीळाहातूनच मृत्यू आला होता. रावण  नीळाला म्हणाला, ’’माझा प्रियतम प्रधान प्रहस्त, त्याला तू ठार केलेस, थांब, त्याचा सूड आज मी घेतल्याशिवाय राहणार नाही’’. त्यावर नीळाने उत्तर दिले, ’’प्रहस्ताची आठवण काढत आहेस ना रावणा, थांब आज मीच त्याच्या भेटीला तुला पाठवून देतो’’ नीळ आणि रावणाच्या युद्धाला रंग भरू लागला. 
 
रावणाशी युद्ध करण्यासाठी लक्ष्मण सज्ज झाला. हनुमानही पुढे सरसावला; मात्र रावणाने  हनुमानाला पाठ दाखवली होती. त्यामुळे युद्धाला तयार असणारा लक्ष्मण आणि हनुमान यांना नीळ आणि रावण यांच्यातील युद्धाचा आनंद घेण्याशिवाय सध्यातरी पर्याय उरला नव्हता. त्या दोघांसह वानरसेना हे युद्ध पाहू लागली. नीळाची कामगिरी पाहताना, तो करीत असलेली रावणाची फजिती बघताना या वानरांच्या आरोळ्यांनी आणि खदाखदा हसण्याने युद्धभूमी निनादत राहिली.

आधार: संत एकनाथकृत भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 17 आणि 18 (अंशत:)

Related Articles