अमेरिकेवर कर्जाचा डोंगर   

वृत्तवेध 

पश्‍चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिकेदरम्यान पुन्हा एकदा तणाव वाढत असताना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान म्हणून राष्ट्रीय कर्जाचा वाढता बोजा चर्चेत आला आहे. उपलब्ध आर्थिक आकडेवारीनुसार, अमेरिकेचे एकूण राष्ट्रीय कर्ज सुमारे 39.4 ट्रिलियन डॉलर्स इतके झाले असून, गेल्या बारा महिन्यांमध्ये त्यामध्ये 3.2 ट्रिलियन डॉलर इतकी भर पडली आहे. म्हणजेच दरमहा सरासरी सुमारे 209 अब्ज डॉलर इतक्या वेगाने कर्ज वाढत असल्याचे चित्र आहे. 2020 पासून आतापर्यंत अमेरिकेच्या कर्जात तब्बल 16.3 ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने कर्ज नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला असला, तरी अद्याप त्यातून अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाहीत.
 
दरम्यान, इराणमधील लष्करी कारवायांमुळे जागतिक ऊर्जा बाजारावरही परिणाम झाला आहे. अमेरिकेने गेल्या काही दिवसांमध्ये इराणमधील लष्करी तळांवर हल्ले केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 11 टक्क्यांनी वाढ होऊन ते महिनाभरातील उच्चांकावर पोहोचले आहे. यामुळे जागतिक महागाईचा दबाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्जावरील व्याजाचा खर्चही सातत्याने वाढत आहे. सध्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे 3.2 टक्के हिस्सा केवळ कर्जावरील व्याजफेडीसाठी खर्च होत आहे. 1970 नंतर ही सर्वाधिक पातळी मानली जात आहे. 2020 पासून अमेरिकेच्या व्याज देयकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. इराणमधील लष्करी मोहिमांमुळे अमेरिकेच्या संरक्षण खर्चातही मोठी वाढ झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने यापूर्वी इराणविरुद्ध लष्करी कारवाया केल्या होत्या. त्या काळात सुमारे 108 दिवस चाललेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेने केवळ लष्करी कारवाईवर 113 अब्ज डॉलर इतका खर्च केल्याचा अंदाज आहे. आता पुन्हा संघर्ष तीव्र होत असून अमेरिकेने अत्याधुनिक एफ-22 रॅप्टर लढाऊ विमानही तैनात केले आहे. वाढता संरक्षण खर्च, चढते व्याजदर आणि प्रचंड राष्ट्रीय कर्ज यामुळे अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवर आगामी काळात आणखी ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles