रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये नऊ ठार   

कीव्ह : रशियाने शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत युक्रेनची राजधानी कीव्हवर भीषण क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 9 जण ठार झाले असून, 22 जण जखमी झाले आहेत.हल्ल्यात कीव्हच्या सोलोमियांस्की जिल्ह्यात इमारतीचे अवशेष कोसळल्याने एका पाचमजली निवासी इमारतीचे नुकसान झाले आणि तिथे आग लागली. बचाव पथकाने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून 35 लोकांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन मुलांसह आठ जण जखमी झाले आहेत.
 
दारनित्स्की जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यामुळे घरे, प्रशासकीय इमारत आणि व्यावसायिक इमारतींना आग लागली. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागात सात जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.शेवचेन्किव्स्की जिल्ह्यातही आपत्कालीन कर्मचार्‍यांनी एका व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, एका इतर निवासी इमारतीत काही लोक अडकल्याची भीती जिल्हा महापौरांनी आधी व्यक्त केली होती, त्याबाबत कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही.शहरातील इतर दोन जिल्ह्यांतही व्यावसायिक आणि निवासी इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सातत्याने अमेरिका आणि इतर पाश्‍चात्त्य मित्रदेशांकडे हवाई हल्ले रोखणार्‍या संरक्षण यंत्रणेची मागणी करत आहेत.
 
झेलेन्स्की म्हणाले, देशावर रशियाचे हवाई हल्ले सतत सुरू आहेत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखण्यासाठी पॅट्रीअट प्रणालीचे इंटरसेप्टर्स आणि हवाई संरक्षण क्षमता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे. जुलैमध्ये अंकारा येथील नाटो शिखर परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी युक्रेनला पॅट्रीअट प्रणालीच्या निर्मितीचा परवाना देईल, असे म्हटले होते. मात्र, त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. दोन दिवसांपूर्वीच रशियाने संपूर्ण युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला होता. यात 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 50 हून अधिक जण जखमी झाले होते. तसेच, एक रशियन क्षेपणास्त्र पोलंडच्या हवाई क्षेत्रातही शिरले होते. आधी दोन आठवड्यातून किंवा आठवड्यातून एकदा हल्ला होत असे, पण आता दररोज हल्ले होत आहेत. हे सहन करणे अत्यंत कठीण होत चालले आहे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

Related Articles