भीमा नदीने गाठली इशारा पातळी   

सोलापूर, (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील पावसामुळे दौंड येथून भीमा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात शनिवारी सुद्धा 82 हजार क्युसेक वेगाने आणि वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात 40 हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आल्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीने इशारा पातळी गाठली आहे. यामुळे नदीकाठच्या व्यास नारायण झोपडपट्टीमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाले आहे.
 
भीमा नदीच्या खोर्‍यामध्ये पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी दौंड येथे भीमा नदी पात्रामध्ये अद्याप 97 हजार क्युसेक वेगाने पाणी उजनी धरणामध्ये येत आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरणांमधून पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. शुक्रवारपासून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 82 हजार क्युसेक वेगाने भीमा नदीत सोडण्यात आले.  उजनी व वीर धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर येथील भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 442 मीटर पाणी पातळी झाली आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या अंदाजानुसार पंढरपूरमध्ये नदीपात्रात 443 मीटर इतकी पाणी पातळी गाठल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Related Articles