सराईत गुन्हेगार साहिल तांबे एक वर्षासाठी हद्दपार   

ओतूर, (वार्ताहर) : वारंवार गुन्हे करणार्‍या इसमाविरुद्ध ओतूर पोलिसांनी कठोर कारवाई करत साहिल जीवन तांबे (वय 21, रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) यास एक वर्षासाठी पुणे व ठाणे जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगिरे यांनी सांगितले. ओतूर पोलीस ठाण्यात साहिल तांबे याच्याविरुद्ध एकूण सहा गुन्हे दाखल असून त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये त्याच्याविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचा विचार करून मंचर येथील उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी त्याला 27 जुलै 2027 पर्यंत हद्दपारीचे आदेश दिले.
 
दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करत साहिल तांबे याला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे नातेवाईकांकडे सोडले. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांचा सहभाग होता. वारंवार गुन्हे करणार्‍या इसमांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. 

Related Articles