अमली पदार्थ विक्री प्रकरणात अडीचशेहून अधिक जणांना अटक   

पोलिसांची विशेष मोहीम; 162 गुन्हे दाखल

पुणे : अमली पदार्थांचा चोरटा व्यापार आणि विक्री करणार्‍यांविरुद्ध पुणे पोलिसांनी धडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या सात महिन्यांत अमली पदार्थ विक्री प्रकरणात 283 जणांना अटक करण्यात आली असून शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत 162 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी शहर, अशी ओळख असलेल्या शहर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील तरुण स्थायिक झाले आहेत. रोजगाराच्या शोधात परप्रांतातून स्थायिक होणार्‍यांची संख्या देखील वाढली आहे. शहरात अमली पदार्थ विक्री, तसेच चोरट्या व्यापार्‍याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकार्‍यांना दिले आहेत. तसेच, अमली पदार्थ विक्रीच्या मूळापर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 
 
गेल्या सात महिन्यांत अमली पदार्थ विक्री प्रकरणात 162 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांविरुद्ध 138 गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थाच्या चोरट्या व्यापाराविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
 
अमली पदार्थाचा चोरटा व्यापार, विक्रीप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. या पुढील काळात ही मोहीम गतीने सुरू राहणार आहे. अमली पदार्थांचे व्यसन करणार्‍यांकडे गुन्हेगार म्हणून पाहू नये. समुपदेशन, व्यसनमुक्ती, पुनर्वसनाची संधी देणे आवश्यक आहे. 
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

Related Articles