E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
युरोपचा उकाडा: जगासाठीची धोक्याची घंटा
Wrutuja pandharpure
02 Aug 2026
मिलिंद बेंडाळे
या वर्षी युरोपमध्ये आलेली उष्णतेची लाट जगासाठी गंभीर धोक्याची घंटा ठरत आहे. निसर्गाच्या या इशार्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यात अधिक मोठ्या आर्थिक आणि पर्यावरणीय संकटाला आमंत्रण देणे होय. हवामानबदलाविरुद्धची लढाई ही आता केवळ पर्यावरणप्रेमींची राहिलेली नाही, तर प्रत्येक देशाची सामूहिक जबाबदारी बनली आहे. अन्यथा, हे चित्र उद्या संपूर्ण जगाचे वास्तव ठरू शकते.
एके काळी आल्हाददायक हवामान, हिरवीगार जंगले, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि सौम्य उन्हाळ्यासाठी ओळखला जाणारा युरोप अभूतपूर्व उष्णतेच्या विळख्यात सापडला आहे. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, स्वित्झर्लंड, चेेक प्रजासत्ताक, डेन्मार्क आणि स्वीडनसारख्या देशांमध्ये तपमानाने इतिहासातील अनेक विक्रम मोडले. या उष्णतेमुळे मध्यंतरी फ्रान्समध्ये अवघ्या तीन दिवसांमध्ये सुमारे एक हजार अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जूनच्या उत्तरार्धापासून संपूर्ण युरोपमध्ये उष्माघात आणि उष्णतेशी संबंधित कारणांमुळे हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपमधील हवामान तज्ज्ञांच्या ‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन’ या अभ्यासगटाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या संशोधनात एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष मांडला आहे. या अभ्यासानुसार, युरोपमधील विक्रमी उष्णतेची लाट मानवनिर्मित हवामान बदलाशिवाय जवळपास अशक्य होती.
समोर आलेल्या तपशिलानुसार पन्नास वर्षांपूर्वी अशी उष्णतेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी होती; परंतु आज तिची शक्यता दोन दशकांपूर्वीपेक्षा तब्बल दोनशे पट वाढली आहे. हा निष्कर्ष केवळ वैज्ञानिक निरीक्षण नाही, तर विकासाच्या नावाखाली पृथ्वीच्या संसाधनांचा अमर्याद वापर करणार्या मानवजातीसमोर ठेवलेला आरसा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने युरोपला पृथ्वीवरील सर्वाधिक वेगाने तापणारा खंड घोषित केले आहे. जागतिक सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट वेगाने येथे तपमान वाढत आहे. ही बाब विशेष चिंताजनक आहे, युरोपमधील बहुतांश घरे, कार्यालये, शाळा आणि सार्वजनिक इमारती थंड हवामान लक्षात घेऊन उभारण्यात आल्या आहेत. तेथील जीवनशैलीही उष्ण प्रदेशांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे 38 ते 40 अंश सेल्सिअस तपमानही तेथील नागरिकांसाठी जीवघेणे ठरते. परिणामी रुग्णालयांमध्ये उष्माघात, हृदयविकार, श्वसनाचे विकार आणि निर्जलीकरणाने अस्वस्थ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
फ्रान्समधील सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार उष्णतेच्या तीव्र लाटेदरम्यान दररोज होणार्या मृत्यूंची संख्या सामान्य दिवसांच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढली. अजूनही घरांमध्ये झालेल्या मृत्यूंची संपूर्ण नोंद उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष मृतांचा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उष्णतेचा सर्वाधिक फटका वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आणि आधीपासून गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना बसतो.
उष्णतेमुळे पर्यावरणीय आणि आर्थिक संकटांची मालिका निर्माण होते. जर्मनीमध्ये अनेक ठिकाणी जंगलांना आग लागली. विशेष म्हणजे काही भागांमध्ये दुसर्या महायुद्धातील न फुटलेला दारुगोळा अजूनही जमिनीत असल्याने अग्निशमन दलालाही जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. अनेक गावांमधील नागरिकांना स्थलांतर करावे लागले. स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये उष्णतेनंतर विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि वादळांनी थैमान घातले. हवामानातील ही टोकाची अस्थिरता भविष्यात वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ही परिस्थिती जगभरासाठी इशारा आहे. भारतालाही गेल्या काही वर्षांमध्ये विक्रमी उष्णतेच्या लाटा, अनियमित मान्सून, अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ आणि जंगलातील आगींचा वाढता सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र, राजस्तान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य भारतातील अनेक शहरांमध्ये तापमान 47 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. शहरांमधील काँक्रीटचे वाढते जाळे, कमी होत चाललेली झाडे, वाढते प्रदूषण आणि अनियंत्रित शहरीकरण यामुळे उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. युरोपमध्ये आज निर्माण झालेली परिस्थिती विकसित देशही हवामानबदलापुढे असहाय ठरू शकतात, याचा पुरावा आहे. अनेक दशकांपासून औद्योगिकीकरण, कोळसा आणि खनिज तेलाचा अमर्याद वापर, जंगलतोड आणि कार्बन उत्सर्जन यात विकसित देशांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे आज त्यांनाच त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतासारख्या विकसनशील देशांनी विकास आणि पर्यावरणातील संतुलन साधणे अधिक आवश्यक झाले आहे. जागतिक तपमानवाढीचा सर्वात मोठा परिणाम शेतीवर होणार आहे. उष्णतेमुळे मातीतील आर्द्रता कमी होते, पिकांचे उत्पादन घटते, पाण्याची उपलब्धता कमी होते आणि अन्नसुरक्षेवर परिणाम होतो. युरोपमधील अनेक भागांमध्ये पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतातही उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे फळबागा, भाजीपाला आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याची उदाहरणे वाढत आहेत. भविष्यात अन्नधान्याच्या किमती वाढणे, महागाई तीव्र होणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडणे हेही या साखळीचे परिणाम असू शकतात.
या संकटाचा ऊर्जाक्षेत्रावरही मोठा परिणाम होत आहे. उष्णतेमुळे वातानुकूलन यंत्रांचा वापर वाढतो. परिणामी विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचते. अनेक देशांमध्ये वीजजाळ्यावर ताण निर्माण झाला आहे. दुसरीकडे, जलाशयांमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने जलविद्युत निर्मितीवरही परिणाम होतो. त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचाही प्रश्न अधिक गंभीर बनतो. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देशाने दीर्घकालीन धोरणे आखणे आवश्यक आहे. शहरांमध्ये हरित पट्टे वाढवणे, उष्णतेशी सुसंगत शहरी नियोजन करणे, सार्वजनिक इमारती ऊर्जा कार्यक्षम बनवणे, जलसंधारणाला प्राधान्य देणे, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि कार्बन उत्सर्जनात सातत्याने घट करणे ही आता अपरिहार्यता आहे.
येत्या काळात प्रत्येक शहरासाठी ‘हीट अॅक्शन प्लॅन’ प्रभावीपणे राबवणे, हवामानाचा अचूक अंदाज नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचवणे आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. भारतात काही राज्यांनी उष्णताविरोधी कृती आराखडे तयार केले असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी अद्याप सर्वत्र दिसून येत नाही. शहरे विस्तारत असताना खुल्या जागा, जलाशय आणि झाडे वेगाने नष्ट होत आहेत. उष्णतेशी सामना करण्यासाठी पारंपरिक वास्तुकला, स्थानिक जलव्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक नागरी विकास या संकल्पनांना पुन्हा महत्त्व द्यावे लागेल.
या संपूर्ण संकटात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे आपण हवामान बदलाला अजूनही भविष्याचा धोका समजणार आहोत की वर्तमानातील राष्ट्रीय आणि जागतिक आपत्ती? युरोपमधील हजारो मृत्यू, जंगलातील आगी, वीज व्यवस्थेवरील ताण, कृषी उत्पादनावरील परिणाम आणि आरोग्य व्यवस्थेची होणारी दमछाक या सर्व घटना सांगतात, की हवामानबदल आता दारात उभा नाही, तर घरात शिरला आहे. आज केवळ सरकारांची इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर समाजाचीही जबाबदारी महत्वाची असणार आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याची बचत, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे तितकेच आवश्यक आहे. औद्योगिक विकास, नागरी विस्तार आणि आर्थिक प्रगती यांची दिशा पर्यावरणाशी सुसंगत असेल, तरच पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य निर्माण होईल.
Related
Articles
कर्नाटकात गुटखा आणि पानमसाल्यावर वर्षभर बंदी
13 Aug 2026
टेक्सासमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
14 Aug 2026
रशियाच्या आंतरराष्ट्रीय लवादात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड मध्यस्थ
14 Aug 2026
काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये निवासी प्रशिक्षण शिबिर
14 Aug 2026
सेवाभरती परीक्षेत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती
13 Aug 2026
वाचक लिहितात
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा