शहरीकरणामुळे तीस वर्षांत पुण्यात काँक्रीटचे जंगल   

घनदाट हरित क्षेत्र अवघे नऊ टक्क्यांवर; उपग्रह चित्रांतून धक्कादायक वास्तव उघड 

पुणे : शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहराच्या गेल्या 30 वर्षांतील झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम झाल्याचे पुणे महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवाल 2025-26 मधून समोर आले आहे. 1994 ते 2025 या कालावधीतील उपग्रह चित्रांच्या तुलनात्मक विश्लेषणातून शहराचा मोठा भूभाग काँक्रीटच्या जंगलात परिवर्तित झाला आहे. सलग असलेले हरित पट्टे तुटून विखुरले गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
 
महापालिकेने सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या सहकार्याने तयार केलेला पर्यावरण स्थिती अहवाल बुधवारी सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आला. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार दरवर्षी 31 जुलैपूर्वी पर्यावरण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. यंदाच्या अहवालात जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि प्रथमच आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर स्वतंत्र प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यासाठी 60 कृतीयोग्य शिफारशीही मांडण्यात आल्या आहेत.
 
अहवालानुसार, 1994 मध्ये मध्यवर्ती पेठा आणि नदीसंगम परिसरापुरते मर्यादित असलेले पुणे आज 478.29 चौ.कि.मी. क्षेत्रापर्यंत विस्तारले आहे. शहराच्या मूळ हद्दीबाहेरील शेती, मोकळी जमीन आणि टेकड्यांचे उतार आता मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले व व्यावसायिक इमारतींनी व्यापले आहेत. उपग्रह चित्रांच्या विश्लेषणातून शहराच्या एकूण भूभागापैकी 19.08 टक्के क्षेत्र इमारती, रस्ते आणि काँक्रीटच्या पृष्ठभागाने व्यापले असल्याचे दिसून आले आहे. तसेच 30.19 टक्के क्षेत्रात विरळ झुडपे, गवत आणि मोकळी जागा शिल्लक असून तीही वेगाने कमी होत आहे. 22.74 टक्के क्षेत्रात मध्यम स्वरूपाची वनस्पती आणि शेती असून तेही शहरीकरणाच्या विळख्यात जात आहे.
 
याशिवाय 11.12 टक्के क्षेत्र मोकळ्या मातीचे किंवा रिकाम्या जमिनीचे असून बहुतांश ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे शहरातील घनदाट हरित क्षेत्र केवळ 9.11 टक्क्यांवर आले आहे. पूर्वी सलग असलेले हरित पट्टे आता तुटून लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागले गेले आहेत. नद्या, कालवे, तलाव आणि धरणांचा मिळून शहराच्या भूभागातील वाटा केवळ 1.81 टक्के असून त्यांच्यावर प्रदूषण आणि अतिक्रमणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. अहवालासाठी 1994 मधील लँडसॅट-5 आणि 2025 मधील सेंटिनेल-2 या उपग्रहांच्या प्रतिमांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यातून शहराच्या केंद्राबाहेरील शेती, मोकळ्या जागा आणि टेकड्यांचे उतार मोठ्या प्रमाणावर निवासी व व्यावसायिक बांधकामांनी व्यापल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles