लोखंडी सळईने भरलेल्या मालमोटारीला एसटी बसची धडक   

चालकासह महिला प्रवाशाचा मृत्यू

सोलापूर, (प्रतिनिधी) : पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेळगी पुलावर शुक्रवारी पहाटे सळईने भरलेल्या मालमोटारीला एसटी बसने धडक दिली. या भीषण अपघातात बस चालक आणि एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, दहा प्रवासी जखमी झाले आहेत.दादाराव भालचंद्र बनसोडे (वय-43, रा. चिवरी, उमरगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे बस चालकाचे नाव आहे. तर, नागुबाई राम रेवगे (वय-48, रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे मृत महिला प्रवाशाचे नाव आहे.
 
‘हिरकणी’ बस पुणे जिल्ह्यातील कुरकुंभहून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे निघाली होती. पुणे-हैदराबाद महामार्गावरून जात असताना सोलापूर शहरातील शेळगी पुलावर बसची लोखंडी सळईने भरलेल्या मालमोटारीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.या अपघातानंतर जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Articles