नेपाळमध्ये संचारबंदी कायम   

काठमांडू : नेपाळच्या कोशी प्रांतातील, भारताला लागून असलेल्या सुनसरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर गुरुवारी सलग चौथ्या दिवशीही अनिश्‍चित काळासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी कायम राहिली. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. सुनसरीचे सहायक मुख्य जिल्हा अधिकारी पोषण लामिछाने यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुरक्षा परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी संचारबंदी लागू केली होती. नंतर, पूर्व-पश्‍चिम महामार्गासह 10 भागांमध्ये तिचा विस्तार करण्यात आला.अधिकार्‍याने सांगितले की, पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीअंतर्गत नागरिकांच्या हालचाली, गर्दी, निदर्शने, जाहीर सभा आणि धरणे यांसारख्या सर्व हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, विविध संवेदनशील भागांमध्ये आणि सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी देशातील, विशेषतः सुनसरी जिल्ह्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेतली. 

Related Articles