तुकाराम मुंढे यांच्या विरोधात 29 अधिकारी एकवटले   

कामाच्या वाढीव वेळांमुळे नाराजी; मंत्री झिरवाळ यांच्याकडे तक्रार 

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीविरोधात विभागातील अधिकारी आणि कर्मचारी एकवटले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए प्रयोगशाळेतील 29 अधिकारी व कर्मचार्‍यांनी खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार करून वाढीव कामाचा ताण, दोन  पाळ्यांमध्ये काम आणि सुट्टीच्या दिवशीही काम करण्याच्या आदेशांबाबत आक्षेप नोंदवला आहे.
 
 कर्मचार्‍यांनी तक्रारपत्रात प्रयोगशाळेत अचानक दोन पाळ्या सुरू करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने विद्यमान कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करावे लागत असून, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कामाचे आदेश दिले जात असल्याची तक्रार कर्मचार्‍यांनी केली आहे.
 
वाढत्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहायक आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या विश्‍लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीतीही तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. दोन पाळ्यांची पद्धत रद्द करून पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी तसेच आवश्यक मनुष्यबळाची भरती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
 
दरम्यान, एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर मुंबई उच्च न्यायालयानेही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई न करता सरकारी कार्यालये तसेच मंत्री किंवा सरकारी संस्थांच्या मालकीच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मंत्रालय, मुंबई उच्च न्यायालय तसेच सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांतील कॅन्टीनची तातडीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने एफडीएला दिले आहेत.

Related Articles