इन घटाओं का मोल क्या दोेगे?   

राजभूषण सहस्रबुद्धे (मो. 9822206026)

काहे पैसे पे इतना गुरूर करे है 
फूल बिक जाते हैं, खुुश्बू बिकती नहीं
जिस्म बिक जाते हैं, रूह बिकती नहीं
चैन बिकता नहीं, ख्वाब बिकते नहीं
दिल के अरमान बेताब बिकते नहीं
इन हवाओं का मोल क्या दोगे ?
इन घटाओं का मोल क्या दोगे ?
अरे इन जमीनों का मोल हो शायद
आसमानों का मोल क्या दोगे ?
ये दिमागों में पैदा फितूर करे है
 
लावारीस (1981) या चित्रपटातील गीताचे बोल म्हणजेच EVEN THE R­IN (2010) या बोलिव्हियाच्या चित्रपटातील नायका सोबतच तिसर्‍या जगातील प्रत्येक गरीब नागरिकाचा बहुराष्ट्रीय कंपन्यांना केलेला सवाल आहे. चित्रपट कोलंबसचा पहिला जगप्रवास, ख्रिस्ती धर्मप्रसार आणि हिस्पॅनियोलावर स्पॅनिश सत्ता लादण्याविरोधात स्थानिक रहिवाशांच्या बंडावर आधारित ऐतिहासिक चित्रपटासाठी निर्माता कोस्टा कलाकार, तंत्रज्ञांसह बोलिव्हियातील कोचाबाम्बा शहरात येतो. त्याने अगदी स्वस्तात दुय्यम कलाकार आणि कामासाठी मजूरही मिळतील म्हणून द. अमेरिकेतील सर्वात गरीब देश बोलिव्हियाची निवड केलेली असते. निवड प्रक्रियेत शेकडो स्थानिक लोक येतात; पण दिग्दर्शक सेबॅस्टियन फारच थोड्या जणांची निवड करतो. आपली मुलगी बेलनला काम मिळावे यासाठी डॅनियल त्यांच्याशी भांडतो. याच वैशिष्ट्यासाठी सेबॅस्टियन कोलंबसविरुद्धच्या विरोधातील बंडखोर नेता हातुएच्या भूमिकेसाठी त्याची निवड करतो. ’पुढे तो जास्त त्रास देईल’ असा कोस्टाचा विरोध न जुमानता. बेलनलाही काम मिळते आणि चित्रीकरण सुरळीत सुरू होते.  
 
एकदा कोस्टा इंग्रजी समजणार नाही, असे समजून डॅनियलसमोरच फोनवर स्थानिक लोकांची इंग्रजी भाषेत अपमानास्पद चेष्टा करतो; पण डॅनियलला इंग्रजी येत असल्याने तो कोस्टाला त्यांचा अपमान करुन गैरफायदा घेतल्याचा जाब विचारतो. कोस्टा वरमतो आणि माफी मागतो. चित्रीकरणादरम्यान कोचाबाम्बामधे पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीला बहुराष्ट्रीय कंपनीने टाळे लावल्यामुळे स्थानिकांचा संताप शिगेला पोहोचतो अन् ते डॅनियलच्या नेतृत्वात पाण्याच्या हक्‍कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. झालेल्या दंगलीत पोलिस डॅनियलला मारहाण करतात. ते पाहून कोस्टा चिडून डॅनियलला चित्रिकरण पूर्ण होईपर्यंत शांत राहण्यास सांगतो. अधिक मानधन देतो. पण डॅनियल ते पैसे आंदोलक सहकार्‍यांसाठी वापरुन आंदोलन अधिक तीव्र करतो. परिणामी त्याला तुरुंगात जावे लागते. तेव्हा कोस्टाचा संयम सुटतो.
 
सेबॅस्टियनही मनातील नैतिक द्वंद्वामुळे चित्रपट पूर्ण होण्याबाबत साशंक होतो. तेव्हा कोस्टा पोलिसांना लाच देऊन डॅनियलची तात्पुरती सुटका करतो, जेणेकरून एक महत्त्वाचा प्रसंग चित्रीत करता येईल, ज्यात कोलंबस व धर्म प्रसारक, हातुए आणि त्याच्या सहकार्‍यांना क्रॉसला लटकावून जिवंत जाळतात. हा प्रसंग चित्रित झाल्याझाल्या पोलीस येऊन डॅनियलला पुन्हा ताब्यात घेण्यापूर्वीच, त्याचे सहकारी त्याला पळून जाण्यास मदत करतात. त्याच रात्री कोचबाम्बामधील जाळपोळ, हिंसाचारामुळे सर्व कलाकार तंत्रज्ञ घरी परतण्याचा आग्रह धरतात. सेबॅस्टियन नाईलाजास्तव मान्य करतो. दुसर्‍या दिवशी, सर्वजण निघतानाच डॅनियलची पत्नी टेरेसा दंगलीत बेपत्ता बेलनला शोधण्याची कोस्टाला गळ घालते. सेबॅस्टियनचा तीव्र विरोध नाकारुन कोस्टा तिच्यासोबत जातो. वाटेत हिंसाचाराने उध्वस्त कोचबाम्बाची अवस्था पाहून कोस्टाला परिस्थितीचे गांभीर्य समजते. अनेक अडथळ्यांनंतर बेलन पाय गमवलेल्या जखमी अवस्थेत सापडते. अखेरीस आपल्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल भावूक होऊन डॅनियल कृतज्ञता म्हणून कोस्टाला बोलिव्हियन पाण्याने भरलेली एक कुपी भेट देतो.
दोन वेगळ्या काळांना समान धाग्यात गुंफलेला ’चित्रपटातील चित्रपट’ असा हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. इसिआर बोलेन या स्पनिश महिला दिग्दर्शिकेने. इतिहास नव्या रुपात पुनरुज्जीवित होत असल्याच्या तिच्या विचाराला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आणि चित्रपट आस्करच्या लघुयादीतही समाविष्ट झाला होता. ही केवळ एका शहराची गोष्ट नाही, तर एक मोठा संदेश देतो. हवा, डोंगर, नदी, पाणी, पाऊस या नैसर्गिक निःशुल्क संसाधनांवर सर्व जीवांचा जन्मसिद्ध आणि समान हक्क आहे. मग त्यांचा बाजार मांडून धनलांडगे ते सामान्य जनांना वंचित ठेऊन, शोषण कसे करु शकतात? 500 वर्षांपूर्वी कोलंबसने सोने आणि जमिनीसाठी स्थानिकांचे शोषण केले. आज बहुराष्ट्रीय कंपन्या पाणी आणि नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवून अगदी तसेच शोषण करत आहेत. फक्त शोषक बदलले, पद्धत तीच.
 
चित्रपटातील धारदार संवाद आजच्या कॉर्पोरेट जगतावर, कलाकारांच्या दुटप्पी भूमिकेवर थेट प्रहार करतात. कोस्टा म्हणतो, फक्त 2 डॉलर्स देऊन या स्थानिकांकडून काम करवून घेत बरीच बचत करतोय तरी हे बेचारे झकत काम करत आहेत. या बजेटमध्ये हा चित्रपट दुसरीकडे कुठेच बनवू शकलो नसतो. हा संवाद चित्रपट निर्मात्यांची व्यावसायिक क्रूरता आणि शोषण पद्धती स्पष्ट दाखवतो. शेवटी सेबास्टियन म्हणतो, कदाचित चित्रपटाशिवाय लोक जगू शकतात; पण पाण्याशिवाय कोणीही नाही. हा त्याचा आत्मशोध आणि बोधही आहे, तर 2000 मध्ये बोलिव्हिया सरकारने बहुराष्ट्रीय कंपनीसाठी स्थानिक लोकांना नळाचे पाणीच नाही, तर पावसाचे पाणी साठवण्यावरही बंदी घातली होती. त्याच उद्वेग आणि संतापातून एका दृश्यात डॅनियल म्हणतो की, तुम्ही आमचे पाणी विकत आहात आणि आता काय पाऊसही आमच्यापासून हिरावून घेणार आहात?. निसर्गावरील कॉर्पोरेट मालकी हक्काचा निषेध करण्यातून चित्रपटाचे शिर्षक आले ’इव्हन द रेन’. 
 
सेबास्टियन आदर्शवादी दिग्दर्शक, कोलंबसद्वारे स्थानिक लोकांचे शोषणावर चित्रपट बनवताना नकळत आर्थिक हलाखीचा फायदा घेत स्थानिकांना किरकोळ मजूरी देऊन स्वतः शोषक व्यवस्थेचा भाग बनतो. कोलंबस विरोधातील बंडखोरीसाठी डॅनियलची अभिनयातील ताकद हवीय, पण कामात अडथळा ठरणारे आंदोलनाचे नेतृत्व नकोय. हा टोकदार विरोधाभास आहे. त्याला कलात्मक हट्ट अन् मानवी मूल्यांतील या संघर्षातूनच जाणिव होते की, चित्रपटातील ’काल्पनिक’ संघर्षापेक्षा लोकांचा पाण्यासाठीचा ’वास्तविक’ संघर्ष अधिक पटीने मोठा आहे. 
 
भूतकाळातील शोषणावरील चित्रपटाच्या सेटबाहेरच बहुराष्ट्रीय कंपनी खाजगीकरणाने स्थानिकांचे शोषण करते, म्हणजेच इतिहास स्वतःच नव्याने पुन्हा उभा ठाकतो. सुरुवातीला कोस्टा केवळ पैसेकेंद्रीत, व्यावहारिक, स्वार्थी निर्माता ज्याला स्थानिकांच्या त्रासाशी काहीही देणेघेणे नाही, पण तीव्र पाणी आंदोलनामुळे त्याच्यात होणारा हृदयबदल हा कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. टेरेसा कोस्टाकडे मदत मागते, तेव्हा तो चित्रपट बाजूला ठेवून स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवायला जातो. चित्रपटाचा शेवट अत्यंत हृदयस्पर्शी आहे. डॅनियलने कोस्टाला दिलेल्या बाटलीमध्ये केवळ ’पाणी’ नाही, तर त्या लोकांसाठी धमन्यांतील रक्त आणि अस्तित्वाइतकाच अमूल्य असा ’ठेवा’ आहे. पाण्यासाठी पैसे खर्च करायला तयार नसणार्‍याला आता पाण्याचे खरे मूल्य समजते.
 
’पाणी हेच जीवन आहे’. ते विकण्याची वस्तू नसून प्रत्येक सजीवाचा मूलभूत अधिकार आहे. निसर्गाच्या देणगीवर कोण्या एकाची मालकी असूच शकत नाही. आणि जेव्हा प्रश्‍न अस्तित्वाचा येतो, तेव्हा सामान्य जनता जगातील सर्वात मोठ्या शक्तींविरुद्धही उभी राहून जिंकूही शकते. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे इव्हो मोरालेस 2006 मध्ये बोलिव्हियाचे पहिले आदिवासी राष्ट्राध्यक्ष बनले.
 
केरळमध्ये प्लाझिमाडा गावात कोका-कोला कंपनीतर्फे भूगर्भजलाच्या अतिवापराने विहिरी सुकल्या, प्रदूषण झाले. तेव्हा मलियम्मा यांच्या नेतृत्वात स्थानिक महिलांनी प्रदीर्घ लढा (2004) देऊन फॅक्टरी बंद पाडली. उत्तर प्रदेशात ’गंगा पाणी खाजगीकरणा’विरोधी मोठे जन आंदोलन (2002) झाले, तर छत्तीसगढमध्ये शिवनाथ नदीचे पाणी परदेशी कंपनीला देण्याच्या विरोधात स्थानिक शेतकरी आणि मच्छिमारांनी तीव्र संघर्ष करुन करार रद्द केले. पाकिस्तानशी सिंधू नदी वाद. ब्रह्मपुत्रावरील धरणावरुन चीनसोबत तणाव. नाईलवरील धरणामुळे इजिप्त व इथिओपियात संघर्ष, मध्य पूर्वेत जॉर्डन, इस्रायल, सिरिया यांच्यात जॉर्डन नदीच्या पाण्यासाठी संघर्ष. आणि जर भविष्यात तिसरे महायुद्ध झाले, तर त्याचे मुख्य कारण ’तेल’ किंवा ’जमीन’ नसून ’पाणी’च असेल. 
 
अगर बिकता रहे सावन,
तो जल जायेगा जीवन
जरुरी ना बारुदी साधन,
प्यास ही उजाडेगी चमन
आग बरसेंगे जब नयन
फूँक देंगे लंका और रावण
पानी का ये अंतिम रण, 
करेगा इंसानियत का हवन

Related Articles