शंभराव्या साहित्य संमेलनासाठी पाच कोटींचा निधी   

पुणे : आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाच कोटींचा निधी मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच, विविध संमेलनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सामंत यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी तसेच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, राज्याच्या भाषा विभागाचे सचिव शांमकांत देवरे, परिषदेचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन आदी उपस्थित होते.
 
शंभराव्या संमेलनापूर्वी देश-विदेशात 99 नांदी संमेलने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी 5 कोटींची तरतूद केली आहे. परदेशातील संमेलनासाठी सीएसआरच्या माध्यमातून दोन कोटी, विद्यापीठांमध्ये होणार्‍या विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे राज्यातील तेरा विद्यापीठांना मिळून चार कोटींचा निधी असा 18 कोटींचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचेही सामंत यांनी जाहीर केले. परिषदेची वास्तू अद्ययावत करण्यासाठी एक कोटींचा धनादेशही त्यांनी या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपविला.
 
तब्बल शंभर वर्षे मराठी साहित्यिक व साहित्य रसिकांनी संमेलनांचे आयोजन केले हे एक अद्भूत धाडसच आहे. मराठी भाषेची परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीने जतन केली पाहिजे, या इच्छेने मराठी भाषा विभाग साहित्य परिषदेच्या मागे ठामपणे उभा आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाचा केवळ गाजावाजा किंवा इव्हेंट न करता मराठी भाषा सर्वत्र रुजणे या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. साहित्य संमेलनांच्या माध्यमातून फक्त शहरी साहित्यिकांनाच प्राधान्यक्रम देणे योग्य नसून मराठी ग्रामीण साहित्याचे तसेच बोलीभाषेचे जतन व संवर्धन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सावंत यांनी सांगितले.
 
राजेश पांडे म्हणाले, पुण्यात होणारे शंभरावे साहित्य संमेलन जगभरातील मराठी भाषकांपर्यंत पोहोचावे, संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील बृहन महाराष्ट्र मंडळाची संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावी, तसेच शंभराव्या संमेलनापूर्वी देश-विदेशात 99 नांदी संमेलने घेण्यात येणार असून यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे. शंभराव्या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेची चळवळ उभी करायची आहे. योगेश सोमण यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. स्वाती महाळंक यांनी आभार मानले.

Related Articles