अख्तर सय्यद यांचे निधन   

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या अख्तर सय्यद यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्या 78 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अख्तर या दिवंगत सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांच्या पत्नी होत्या.मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील तरतुदीनुसार मुस्लीम दाम्पत्याला मूल दत्तक घेता येत नाही. सय्यदभाई आणि अख्तर यांनी 1976 मध्ये एका मुलाला दत्तक घेतले आणि 1984 मध्ये अख्तर सय्यद यांनी सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील या तरतूदीविरोधात अर्ज दाखल केला होता. मुंबई येथील विधितज्ञ् आर. के. राव हे सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत होते. त्यांनी विनामोबदला ही याचिका चालवली. मात्र काही वर्षांनंतर त्यांचे निधन झाले.
 
अख्तर या अत्यंत प्रेमळ, मितभाषी आणि मुस्लीम सत्यशोधकच्या कार्यकर्त्यांची सावली होत्या. अख्तर यांनी अनेकांना  आपल्या घरी ठेवून प्रेमाने काळजी घेतली. मुस्लीम सत्यशोधक मंडळाने 2003 मध्ये अटी - शर्तीवर आधारलेला आणि समानाधिकाराचा करार असणारा नवा निकाहनामा तयार केला होता. यावर्षी आयोजित केलेल्या मुस्लीम महिलाधिकार परिषदेत सय्यदभाई आणि अख्तर यांनी दुसर्‍यांदा निकाह करण्यात आला होता. 8 एप्रिल 2022 रोजी सय्यदभाईचे निधन झाले. त्यानंतर अख्तर यांची तब्येतीत घसरण सुरू झाली. गेले काही वर्षे त्या अंथरूणावरच होत्या. कुटुंबीय त्यांची देखभाल करीत होते. मुस्लीम सत्यशोधक चळवळीतील आघाडीचा चेहरा म्हणून त्या फार पुढे नसल्या तरी सय्यदभाईच्या सार्वजनिक कार्यात अख्तरचाचींचा सिंहाचा वाटा होता. अनेक मुस्लीम तरूणी चळवळीत उभे राहण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.

Related Articles