राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न   

पुणे : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा मी ही ऐकतो आहे. मात्र कोणाचे विलीनीकरण होणार? याचे मलाही कुतूहल आहे. विलीनीकरण झाले म्हणजे एखाद्या पक्षाचे महत्त्व कमी होत नाही. विलीनीकरण हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्‍न आहे. शरद पवार मोदींना का भेटले याचे उत्तर तेच देऊ शकतील. असे मत उद्योग व भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. 
 
सामंत म्हणाले, नीट परीक्षा पेपर फुटीवरून विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले, जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन केंद्र अथवा राज्य सरकारने नाकारलेले नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत. परीक्षा पारदर्शक व्हाव्यात यासाठी सरकार कठोर कायदा करत आहे. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेले राजकीय पक्ष हे स्वत:च्या अस्तित्वासाठी तेथे गेले. महाराष्ट्रातील जनतेने नाकारलेली लोकं आणि जनाधार गमावलेले पक्ष देखील तेथे जाऊन पेटवा..पेटवा असे सांगत होते. देशावर संकट उभे राहत असताना सर्वांनी एकत्र आले पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विरोधात जाऊन काम करण्याची सरकारची भूमिका नसल्याचेही सामंत यांनी नमूद केले. 
 
काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत बसतात आणि सध्या संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहत आहेत, हीच खूप भाग्याची गोष्ट मानावी लागेल. जी व्यक्ती जंतर-मंतरवर आंदोलनासाठी न जाता थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरात जाते आणि तेथे लोकांना बोलावून घेते, त्यांनी देशहित आणि सुरक्षेच्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जो कडक कायदा करण्यात आला, तो कायदा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठीही लागू होतो.
 
दिपके यांनी पोलिसात तक्रार द्यावी
 
कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांना धमकीचे फोन, संदेश येत असतील तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. संबंधित फोन नंबर आणि संदेश पोलिसांना दाखवावा, महाराष्ट्र पोलिस सक्षम असून ते दोषींवर नक्कीच कडक कारवाई करतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Related Articles