पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये दिलीप गावितला सुवर्ण   

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

ग्लासगो : पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताने इतिहास रचला. पुरुषांच्या 100 मीटर टी47 स्पर्धेत दिलीप महादू गावित याने सुवर्णपदक, तर महमद बासिल मोर्सिंगनकाथ याने रौप्यपदक पटकावत भारताने अव्वल दोन स्थानांवर कब्जा केला. दिलीपने 10.71 सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरीही ठरली. बासिलनेही 10.83 सेकंदांची हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले.
 
इंग्लंडच्या केविन सँटोस याने 10.85 सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील हे भारताचे तिसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी मीराबाई चानू हिने महिला 48 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंगमध्ये, तर शर्मिला धनखड हिने महिला गोळाफेक एफ57 प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.पुरुषांची 100 मीटर टी47 ही पॅरा अ‍ॅथलेटिक्समधील वेगवान धावण्याची स्पर्धा असून एका हातात शारीरिक अपंगत्व किंवा हाताचा अभाव असलेल्या खेळाडूंचा त्यात सहभाग असतो. या अपंगत्वामुळे शरीराच्या एका भागाची ताकद, वेग किंवा समन्वयावर परिणाम होतो. या दोन पदकांमुळे भारताच्या खात्यात आता तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 15 पदके जमा झाली असून पदकतालिकेत भारत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
 
ऐतिहासिक विजयानंतर दिलीपने सांगितले की, सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती; मात्र त्यानंतर त्याने गती वाढवत नेली. सुरुवात थोडी संथ झाली होती. पण त्यानंतर मी हळूहळू वेग वाढवला आणि सुवर्णपदक जिंकणे खूप आनंददायी आहे, असे दिलीप म्हणाला. अंतिम शर्यत पावसामुळे ओलसर झालेल्या ट्रॅकवर झाली. त्यामुळे धावपटूंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. हवामान चांगले नव्हते. योग्य वेळ साधणे कठीण झाले. अशा वातावरणात शरीर सुस्त होते आणि वॉर्म-अप करणेही अवघड जाते, असे त्याने सांगितले.
 
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जन्मलेल्या दिलीपचा डावा हात लहानपणीच पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने कापावा लागला होता. गावात प्रशिक्षणाच्या सुविधा नसतानाही त्याने अ‍ॅथलेटिक्समध्ये वाटचाल सुरू ठेवली. त्याची प्रतिभा शालेय स्तरावरच प्रशिक्षक वैजयंथ काळे यांनी ओळखली. काळे म्हणाले, मी त्याला शाळेत पाहिले आणि त्यानंतर त्याच्या पालकांना प्रशिक्षणासाठी तयार केले. त्यावेळी त्याला पॅरा स्पर्धांविषयी काहीच माहिती नव्हती. तो सामान्य खेळाडूंच्या स्पर्धांमध्येही सहभागी होत असे आणि तिथेही उत्कृष्ट कामगिरी करत होता.
 
आता लक्ष्य पॅरालिम्पिक पदक
 
सध्या मी नोकरीचा विचार करत नाही. माझे ध्येय पदके जिंकण्याचे आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणार्‍या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि त्यानंतरच्या पॅरालिम्पिकमध्ये यापेक्षाही चांगली कामगिरी करेन, असा मला विश्वास आहे, असे तो म्हणाला. 

Related Articles