श्रीशंकरला सलग दुसर्‍यांदा रौप्य   

ग्लासगो : भारताचा अव्वल लांबउडीपटू मुरली श्रीशंकर याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचत सलग दुसर्‍यांदा रौप्यपदक जिंकण्याचा मान मिळवला. राष्ट्रकुल स्पर्धेतील लांबउडी प्रकारात सलग दोन पदके जिंकणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. बर्मिंगहॅम 2022 स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या 27 वर्षीय श्रीशंकरने यावेळी 8.09 मीटरची सर्वोत्तम उडी मारत पुन्हा एकदा रौप्यपदक पटकावले. गेल्या वर्षी गंभीर गुडघ्याच्या दुखापतीनंतर त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे हे यश त्याच्यासाठी अधिक खास ठरले.
 
श्रीशंकरपूर्वी या प्रकारात भारतासाठी केवळ सुरेश बाबू (पुरुष कांस्य, 1978), अंजू बॉबी जॉर्ज (महिला कांस्य, 2002) आणि एम. प्रजुषा (महिला रौप्य, 2010) यांनीच राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकली होती. जमैकाचा माजी विश्वविजेता ताजे गेले याने 8.15 मीटर उडीसह सुवर्णपदक पटकावले, तर यजमान स्कॉटलंडच्या स्टीफन मॅकेंझी याने 8.08 मीटर उडी मारून कांस्यपदक मिळवले. एप्रिल 2024 मध्ये श्रीशंकरच्या गुडघ्यातील पॅटेलर टेंडन फाटल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिकला मुकावे लागले आणि त्याच्या पुनरागमनाबाबतही अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, श्रीशंकरने दमदार पुनरागमन करत सर्व शंका फेटाळून लावल्या. दुसर्‍यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रीशंकरने पहिल्याच प्रयत्नात 8.03 मीटर उडी मारली. दुसर्‍या प्रयत्नात त्याने 8.09 मीटर उडी घेत आघाडी मिळवली. 

Related Articles