नीरज, रोहित आणि यश भालाफेकच्या अंतिम फेरीत   

नीरजची 79.61 मीटर फेक, अरशद नदीमचाही प्रवेश

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 
 
ग्लासगो : भारताचे स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरची सर्वोत्तम फेक करत पाचवे स्थान मिळवले. पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अरशद नदीम याने 78.63 मीटर फेकीसह सातवे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली. पदकासाठीची अंतिम लढत शुक्रवारी मध्यरात्री 12.45 वाजता होणार आहे.नीरजने पहिल्या प्रयत्नात 76.28 मीटर, तर दुसर्‍या प्रयत्नात 79.61 मीटर अंतर गाठले. दुसर्‍या फेकीनंतर त्याने तिसरा प्रयत्न न करता अंतिम फेरीसाठी पात्रता निश्चित केली. भारताचा रोहित यादव 78.37 मीटर फेकीसह नवव्या, तर यश वीर सिंग 78.36 मीटर फेकीसह दहाव्या स्थानावर राहून अंतिम फेरीत पोहोचला.
 
नीरज-अरशद पुन्हा आमनेसामने
 
नीरज चोप्रा आणि अरशद नदीम यांच्यातील पहिली लढत 2016 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत झाली होती. त्यानंतर दोघे 11 स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर आले असून, त्यापैकी 10 वेळा नीरजने अरशदला मागे टाकले आहे. अरशदला एकमेव यश पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मिळाले होते. 

Related Articles