वाचक लिहितात   

सफाई कामगारांची सुरक्षा
 
धार्मिक उत्सव आणि यात्रा - जत्रा निमित्ताने लाखो - कोटींच्या संख्येने भाविक जमा होत असतात; पण या भक्तिमय गर्दीत स्वच्छता राखणारे असंख्य सफाई कर्मचारी व्यवस्थेकडून कधी खिजगणतीत देखील धरले जात नाही. देशभरात सफाई कर्मचार्‍यांचे कामावर असताना मृत्यू होत असतात. यावर चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने ’जगात कुठेही गॅस चेंबरमध्ये माणसांना अशा प्रकारे हकनाक मरण्यासाठी पाठवले जात नाही’ अशा कडक शब्दांत सरकार आणि व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. सर्वेक्षणानुसार सफाई कर्मचारी तसेच हाती मैला उचलणारे कर्मचारी यांचे कामादरम्यान होणारे मृत्यू शेकडोंच्या घरात आहेत. सत्ताधार्‍यांकडून स्वच्छ भारत अभियानासारख्या योजना राबवल्या जातात. जेव्हा केव्हा सफाई कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा - त्यांच्या श्रमाच्या, प्रतिष्ठेचा आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचा प्रश्‍न येतो तेव्हा सगळे एकसाथ ’मौन’ धारण करताना आढळतात.
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 
 
अन्य पर्याय काय?
 
रविवार केसरी (दि.26 जुलै)मधील प्रधान यांचा राजीनामा; सीजेपीचे आंदोलन मागे ही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी वाचून व सोबतचे जल्लोषाचे छायाचित्र पाहून युवा शक्ती तसेच या आंदोलनाला पाठबळ देणार्‍या सर्वांची मानसिकता देशाला स्थिर सरकार देण्याचा विद्यमान परिस्थितीपेक्षा चांगला पर्यायी कार्यक्रम खरेच आहे की काय असे वाटू लागले. तसे असेल तर मोदींनी राजीनामा द्यावा आणि सूत्रे पक्षातील दुसर्‍या तुल्यबळ नेत्यांकडे सोपवावीत. विद्यमान शिक्षणमंत्री आणि पंतप्रधान यांच्या  राजीनाम्यासाठी रान उठवून आंदोलन करणार्‍यांसह सर्वांच्या कौटुंबिक सवलती माघारी घेऊन सरकारी तिजोरीवरील ताण कमी केल्याचे दाखवून द्यावे. शिक्षण पद्धतीतील घोटाळे कोण करत आहेत ते शोधून त्यांना शासन करण्याचे अधिकार या नवनवोन्मेष युवांनाच द्यावेत. प्रत्यक्ष प्रवाहात सामील झाल्यावर कशा कशाला तोंड द्यावे लागते हे समजून घेण्याची संधी द्यावी. 
 
श्रीपाद कुलकर्णी, पुणे
 
साथीचे आजार - दक्षता घ्या
 
राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले आहे. पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यातील सर्वच शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाळा सुरू झाला की, ताप व थंडी यांसारखे आजार डोके वर काढत असतात. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे सरकारने आतापासूनच साथीच्या रोग तज्ज्ञांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यामार्फत जनजागृतीवर भर दिला पाहिजे. जर साथीचे आजार उद्भवले, तर प्रशासनाला त्याचा मुकाबला करणे जड जाईल. म्हणूनच साथीचे आजार उद्भवणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. नागरिकांनीही योग्य ती दक्षता घ्यावी.
 
श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे
 
छंदाने मंदावते वृद्धावस्था 
 
इनोव्हेशन अँड एजिंग या जर्नलमध्ये नुकतीच वृद्धत्वाविषयी माहिती प्रसिद्ध झाली आहे. यासाठी सुमारे 3556 वृद्धांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये जे वृद्ध कला, नृत्य, गायन इत्यादी छंद जोपासतात त्यांचे जैविक वृद्धत्व तब्बल 4% पर्यंत कमी होते. इतर छंद केवळ मानसिक आराम देत नाहीत, तर शरीराचे वैश्‍विक घड्याळदेखील मंदावू शकतात. नियमित व्यायाम केल्याने जे फायदे होतात, त्यापेक्षाही जास्त फायदे छंदामुळे होतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करतो व त्याचा वापर नियमित करतो तसेच वाचन, संगीत, चित्रकला इत्यादी छंदामुळे आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे, विविध पर्यटन स्थळांना भेटी देणे यामुळे आपल्या चिंता, काळजी पार विसरून जातात. आपण परत ताजेतवाने होतो. यामुळे शरीरावर मानसिक व शारीरिक परिणाम होतात. यामुळे मन सक्रिय राहते. अनेक सांस्कृतिक उपक्रम लोकांना जोडतात. एकटेपणा व सामाजिक विलगता हे वृद्धत्व व मानसिक आजाराची प्रमुख कारणे मानली जातात. चित्रकला, संगीत इत्यादी छंद असणे आवश्यक आहे. असे छंद नसल्यास काही छंद लावून घ्या. त्यामुळे तुमचे आयुष्य समाधानी व आनंदात जाईल.
 
शांताराम वाघ, पुणे 
 
जनऔषधी केंद्रांचे अस्तित्व टिकवावे!
 
राज्यात गेल्या तीन वर्षांत जनऔषधी केंद्रांची संख्या घटत असून अनेक दुकाने बंद झाल्याची बातमी चिंताजनक आहे. सर्वसामान्यांना कमी किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांइतकीच सुरक्षित व परिणामकारक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तरीही अनेक डॉक्टरांकडून ब्रँडेड औषधांनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे रुग्णांचा कलही महागड्या औषधांकडे राहतो आणि जनऔषधी केंद्रांकडे दुर्लक्ष होते. यामागील कारणांचा गांभीर्याने विचार करून डॉक्टर, औषध विक्रेते आणि रुग्ण यांच्यामध्ये जेनेरिक औषधांविषयी अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. जनऔषधी केंद्रे ही केवळ एक योजना नसून सर्वसामान्यांना परवडणार्‍या आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधार आहेत. सरकारने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच वैद्यकीय क्षेत्रात जेनेरिक औषधांचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी ठोस धोरण राबविण्याची गरज आहे.
 
दीपक गुंडये, वरळी.

Related Articles