विनापरवानगी गैरहजर राहणे पडणार महाग   

अधिकारी, कर्मचार्‍यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

मुंबई, (प्रतिनिधी) : सक्षम प्राधिकार्‍याची पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहणार्‍या तसेच  मुख्यालय सोडून जाणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकारचा सैनिकी कल्याण विभाग आणि सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील अधिनस्त कार्यालयांसाठी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी परिपत्रक जारी केले.या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात. अनुपस्थितीबाबत किंवा कार्यालयात उशिरा येण्याबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही. तसेच, सक्षम प्राधिकार्‍याची पूर्वपरवानगी न घेता विनापरवानगी मुख्यालय सोडून जातात, असे सरकारच्या निदर्शनास आले आहे. 
 
या पार्श्‍वभूमीवर  कार्यालयीन शिस्तीचे काटेकोर पालन करण्याकरिता आणि अशा गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने काल परिपत्रक काढून कारवाईचे  निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचार्‍याने सक्षम प्राधिकार्‍याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जावू नये.  पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणे किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणे ही बाब ’अनधिकृत गैरहजेरी’ मानली जाईल. अशा गैरहजेरीच्या कालावधीसाठी रजा वेतन देय असणार नाही आणि संबंधित महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 नियम 48 नुसार शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र राहील, असे नमूद केले आहे.

Related Articles