राज्यात आज जोरदार पाऊस   

विदर्भ, मराठवाड्यात रेड, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट 

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसासाठी निर्माण झालेली पोषक स्थिती कायम आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात 
आला आहे. 
 
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आज मराठवाडा, विदर्भ, अणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह कोकणातील काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, विदर्भातील वाशिम, अकोला, वर्धा, चंद्रपूर उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोकणातील रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 
 
धाराशिव, लातूर विदर्भातील बुलडाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसह मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
घाट माथ्यावरही जोरदार पाऊस 
 
राज्यातील घाट माथ्यावर आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाला सुरुवात झाल्यानंतर दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मागील दोन दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे घाटातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या भागातील नद्यांना पूर आला आहे. काही रस्त्यांवर पाणी आहे. डोंगरमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. पुढील दोन दिवस घाट माथ्यावर पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 
 
पुण्यात पावसाच्या सरी 
 
पुणे शहर आणि उपनगरात गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह थांबून थांबून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शहरातील कमाल आणि किमान तपमानामध्ये घट झाली आहे. जिल्ह्यातील घाट माथ्यावर मात्र जोरदार पाऊस पडला. शहरात आज (शुक्रवारी) ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Related Articles