बॉक्सिंगमध्ये भारताची सहा पदके निश्‍चित!   

तजिंदरपाल, समरदीप अंतिम फेरीत

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी आणखी प्रभावी कामगिरी करत सहा पदके निश्चित केली आहेत. बुधवारी महिलांच्या 70 किलो गटात अरुंधती चौधरी आणि 51 किलो गटात साक्षी चौधरी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत किमान कांस्यपदक निश्‍चित केले.अरुंधतीने न्यूझीलंडच्या मॉर्गन अँडरसनचा 3-1 असा पराभव केला, तर साक्षीने उत्तर आयर्लंडच्या कॅथलीन प्रैेयरवर 5-0 असा विजय मिळवला. यापूर्वी लव्हलिना बोर्गोहेन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जादुमणी सिंग यांनीही उपांत्य फेरी गाठून भारतासाठी पदके निश्चित केली होती. प्रीतीने 54 किलो गटात उत्तर आयर्लंडच्या निकोल क्लाइडचा 5-0 असा पराभव केला. प्रियाने 60 किलो गटात स्कॉटलंडच्या निया मिशेलवर 4-1 अशी मात केली. जादूमणीने पुरुषांच्या 55 किलो गटात झांबियाच्या म्वेंगो म्वालेचा 5-0 असा पराभव केला. 31 जुलै रोजी होणार्‍या उपांत्य फेरीत प्रीतीचा सामना जमैकाच्या कॅथरीन म्वापेशी, प्रियाचा इंग्लंडच्या लुसी किंग्स-व्हीटलीशी, तर जादूमणीचा नामिबियाच्या फिलिप पुमुलो मुताकेला हाओसेबशी होणार आहे. बॉक्सिंगमध्ये तिसर्‍या स्थानासाठी स्वतंत्र सामना होत नसल्याने उपांत्य फेरीत पराभूत होणार्‍या दोन्ही खेळाडूंना संयुक्त कांस्यपदक दिले जाते. अ‍ॅथलेटिक्समध्ये गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर आणि समरदीप सिंग गिल यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. तूरने 20.14 मीटरचा सर्वोत्तम थ्रो नोंदवला, तर समरदीपने 19.95 मीटरच्या प्रयत्नासह अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी गुरुवारी होणार आहे. 

Related Articles