विचारांची लढाई एकत्र लढत राहू   

निखील वागळे यांचे आवाहन 

 
पुणे : एखाद्याला विचारच मांडू द्यायचे नाहीत, ही कुठली लोकशाही आहे. विचाराची लढाई विचारानेच लढली पाहिजे. भाजपने मर्यादा ओलांडून हल्ला केला असला, तरी येत्या काळातही सर्वांनी एक विचाराने राहून विचाराची लढाई लोकशाही मार्गाने लढण्याचे आवाहन उपस्थितांना केले. 
 
‘निर्भय बनो’ सभा दांडेकर पुलावरील साने गुरूजी स्मारकात पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना वागळे यांनी हे आवाहन केले. यावेळी असिम सरोदे, विश्‍वंभर चौधरी, नितीन वैद्य, अश्‍विनी डोके आदी उपस्थित होते. दरम्यान, वागळे यांना सभेसाठी येवू देणार नसल्याचे भाजपने जाहीर केले होते. त्यानुसार भाजप कार्यकर्त्यांनी साने गुरूजी स्मारकाच्या प्रवेशद्वारावर एकत्र जमून घोषणा देत वागळे यांचा निषेध केला. 
 
वागळे म्हणाले, पुरोगाम्यांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र या राज्यात हुकूमशाही वाढत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित केंद्रात झालेला हल्ला आणि आज झालेला हल्ला हा एका विशिष्ट विचारसरणीने केला आहे. हल्ला करून विचार मारता येत नाहीत. एक वागळे मारला तर हजारो वागळे तयार होतील. मी सत्य मांडतो. काहींना ते सत्य पचत नाही, त्यात माझा काय दोष? असा प्रश्‍नही वागळे यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, हल्ल्याच्या भितीने पोलिसांनी असिम सरोदे यांच्या घरी मला स्थानबद्ध केले. कार्यक्रमाला येताना पुणे पोलिसांनी दहशतवाद्यांसारखी वागणूक दिल्याचा आरोपही वागळे यांनी केला. या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

एकमेकांविरोधात घोषणाबाजी 

 
कोणत्याही परिस्थितीमध्ये निखिल वागळे यांना सभा घेऊन देणार नाही, असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सभेच्या स्थळी पोहोचले, त्यांनी वागळे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यास प्रतिउत्तर म्हणून आंबेडकरवादी संघटना, छात्र भारती संघटना, काँग्रेस, आम आदमी पक्ष यांनीही घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर पोलिसांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
 

हल्लेखोरांना मी माफ केले

 
मी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा अनुयायी आहे. ज्यांनी आमच्यावर हल्ला केला. मोटारीची काच फोडली, शाई फेकली. त्या हल्लेखारांना मी माफ केले. मात्र मला जर संधी मिळाली, तर माझ्या मोटारीवर हल्ला करणार्‍यांचेही मी महात्मा फुलेंसारखे मन परिवर्तन करेन. माझ्यावर आतापर्यंत सात हल्ले झाले आहेत. मी मरणाला घाबरणारा नाही. लोकशाहीची लढाई विचाराने लढत राहणार असल्याचा निर्धारही या वेळी निखील वागळे यांनी केला. 
 

Related Articles