मागील विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्यास भारतीय संघ सज्ज   

मुंबईत बुधवारी रंगणार न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामना  

 
मुंबई : विश्वचषकात बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. साखळी सामन्यातील सर्व सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता विश्वचषकापासून फक्त दोन पावले दूर आहे. परंतु त्याआधी त्यांच्या मार्गात पुन्हा एकदा न्यूझीलंड संघाचा अडसर आहे. कारण 2019 च्या विश्वचषकातही भारतीय संघ साखळी फेरीत उकृष्ट कामगिरी करून उपांत्यफेरीत पोहोचला होता. पण न्यूझीलंडच्या संघाने तेथे भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिल्याने भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. आता 2023 च्या स्पर्धेतही भारतासमोर उपांत्य फेरीत पुन्हा न्यूझीलंडचेच आव्हान आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ 2019 च्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्नात असेल. 
 
मात्र, हा सामना भारतीय संघासाठी तेवढाही सोपा नाही. न्यूझीलंड संघावर दुखापतींचे ग्रहण असले तरी, त्यांचा कर्णधार केन विल्यमसनने संघात पुनरागमन केले आहे. 
 
सुरुवातीला डेवोन कॉनवे, रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स हे चांगली फलंदाजी करीत आहेत. गोलंदाजीत न्यूझीलंडची मदार फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट, टिम साउथी आणि मिचेल सॅन्टनर यांच्यावर आहे. साखळी सामन्यात सुरुवातीला न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर त्यांची गाडी काहीशी रुळावरुन घसरली. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी जर तरच्या समीकरणावर अवलंबून रहावे लागले. पण घसरत चाललेली गाडी वेळीच सावरल्याने गुणतालिकेत त्यांना चौथा क्रमांक मिळाला आणि त्यांनी उपांत्यफेरीत धडक मारली. पण येथे सध्या सर्वोकृष्ट लयीत असलेल्या भारतीय संघाचा सामना करावा लागत असल्याने त्यांना या सामन्यात त्यांचा सर्वात चांगला खेळ करावा लागणार आहे. 
 
दुसरीकडे भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडच्या विरुद्धचा इतिहास फार चांगला नाही. कारण न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला सावध रहावे लागेल आणि गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात भारतीय संघाला उत्तम खेळ करावा लागेल. या सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर भारतीय संघाला एक चूक देखील महागात पडू शकते. त्यामुळे रोहित सेनेला मागचा इतिहास विसरून विजय संपादन करावाच लागेल.
 

वानखेडेवर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा  

 
हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर असल्याने येथील लाल खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चेंडूची चांगली उसळी मिळते. पण ही खेळपट्टी फलंदाजांसाठी देखील तेवढीच अनुकूल आहे. त्यात मैदान लहान असल्याने येथे चौकार आणि षटकारांची आतषबाजी पहावयास मिळेल. तसेच भारताचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर हे घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांना आणि भारतीय संघाला याचा फायदा होऊ शकतो. वानखेडेवर होणार्‍या लढतीत नाणेफेक सर्वात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मैदानावर नाणेफेक गमावणार्‍या संघाला एका वेगळ्याच आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. आतापर्यंत या मैदानावर झालेल्या लढतीतून ही गोष्ट समोर आली असून याला अपवाद भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनादेखील नसेल. वानखेडेवर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाची सरासरी धावसंख्या 357 इतकी आहे. तर धावांचा पाठलाग करणार्‍या संघाची सरासरी 188 इतकी आहे. 
 
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
 
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम  (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सॅन्टनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट. 
 

दबाव असला तरी आमचा आत्मविश्वास चांगला : द्रविड 

 
या सामन्याबाबत बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, आम्हाला कल्पना आहे की, न्यूझीलंडसोबतचा सामना महत्त्वाचा आणि बाद फेरीतील आहे. या लढतीत काही प्रमाणात दबाव असणार हे देखील आम्हाला माहिती आहे. मात्र, ज्यापद्धतीने आम्ही आतापर्यंत हा दबाव हाताळला आहे आणि त्याला उत्तर दिले आहे ते पाहता आमचा आत्मविश्वास वाढला आहे. संघाच्या दृष्टिकोनात आणि तयारीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 
 

उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघ अधिक धोकादायक : टेलर

 
विश्वचषकाचा भारत  दावेदार आहे, ते घरच्या मैदानावर खेळत आहेत. साखळी सामन्यात त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. पण जेव्हा गमावण्यासारखे काही नसते तेव्हा न्यूझीलंड संघ अधिक धोकादायक बनतो. जर भारत कोणत्या संघाचा सामना करायला घाबरत असेल, तर तो संघ न्यूझीलंडचा आहे, असे रॉस टेलरने म्हटले आहे. 
 

Related Articles