राज्यात ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करणार   

मुंबई, (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून, येत्या काळात ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणार्‍या विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की नुकत्याच झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत ‘विकसित भारत २०४७’च्या दृष्टीने नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. २०४७ पर्यंत भारतात ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई-सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. 

Related Articles