खिलाडू वृत्तीचा उत्सव (अग्रलेख)   

मनु भाकर हिने कांस्य पदक जिंकणे ही ऐतिहासिक कामगिरी आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. या पुढेही आणखी पदके मिळण्याची आशा आहे.
 
निळ्या, पांढर्‍या आणि लाल रंगांची उधळण करणार्‍या आतषबाजीने फ्रान्सचा राष्ट्रीय झेंडा पॅरिसच्या आकाशावर साकारला, सिएन नदीच्या दोन्ही तीरांवर आणि आसपासच्या इमारतींच्या छतांवरही नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम सुरु होते, सिएन नदीतून हजारो क्रीडापटु आपआपल्या देशांचे झेंडे फडकावत आले. या प्रवासात त्यांना पॅरिसमधील लूव्र संग्रहालय, आयफेल टॉवर आदी अनेक जग प्रसिद्ध स्थळांचे दर्शन झाले. सुमारे चार तास चाललेल्या या कार्यक्रमानंतर फ्रान्सच्या दोन प्रख्यात क्रीडा पटूंनी ऑलिंपिक ज्योत प्रज्ज्वलित केली. आकाशात सोडलेल्या मोठ्या ‘हॉट एअर बलून’सारखी या ऑलिंपिक ज्योतीच्या स्तंभाची रचना केली आहे. त्या नंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी २०२४च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली. एखाद्या मोठ्या स्टेडियमऐवजी नदीत ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंग्रज गायिका लेडी गागा, सेलिन डिऑन या सारख्या जगविख्यात गायिकांचे कार्यक्रम हे या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य होते. हा सोहळा होण्यापूर्वी फ्रान्समधील वेगवान रेल्वेच्या मार्गांवर घातपात घडवून रेल्वे सेवा विस्कळीत करण्यात आली होती; पण त्याचा या समारंभावर परिणाम झाला नाही.

भारताला आशा

बरोबर शंभर वर्षांपूर्वी पॅरिसने ऑलिम्पिक स्पर्धेचे दुसर्‍यांदा यजमान पद भूषविले होते. तीन वेळा ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान पॅरिसने मिळवला आहे. टोकियोमध्ये २०२१ मध्ये ही स्पर्धा कोरोनाच्या छायेत पार पडली होती. त्यामुळे यंदा उद्घाटन सोहळा भव्य व संस्मरणीय करण्याचा चंग फ्रान्सने बांधला होता. तसा तो झाला यात शंका नाही. ऐनवेळी पावसाने हजेरी लावली तरी स्पर्धक प्रेक्षक व आयोजक यांच्या उत्साहात खंड पडला नाही. ही स्पर्धा ‘पर्यावरण पूरक’ करण्याचेही फ्रान्सने जाहीर केले आहे. जागतिक क्रीडा स्पर्धा आयोजित होताना त्या देशात मोठ्या प्रमाणावर बांधकाम होते, त्यातून प्रदूषण वाढते; मात्र अस्तित्वात असलेल्या स्टेडियम्स, मैदाने व इमारती यामध्ये ९५ टक्के स्पर्धा घेण्याचे फ्रान्सने नियोजन केले आहे. स्पर्धेच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण १७ लाख हजार टन राहील याची दक्षता फ्रान्स घेत आहे. हेही या स्पर्धेचे वेगळेपण म्हणावे लागेल.  देश व अधिकृत वसाहती अशा २००पेक्षा जास्त ठिकाणांहून दहा हजारांपेक्षा जास्त स्पर्धक पॅरिसमध्ये आले आहेत. ३२ क्रीडाप्रकारांमध्ये ते भाग घेत आहेत. भारताने यंदा ११७ खेळाडूंचे पथक या स्पर्धेसाठी पाठवले आहे. त्यात ७० पुरुष व ४७ महिला आहेत. कुस्ती, नौकानयन, हॉकी, भालाफेक, बॅडमिंटन, टेबल टेनिस, नेमबाजी, तिरंदाजी, मुष्टीयुद्ध  आदी १६ क्रीडा प्रकारांमध्ये ते भाग घेतील. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके पटकावली होती. भालाफेकीत नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले होते. याही वेळी त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. बॅडमिंटनमध्ये महिला गटात पी.व्ही. सिंधूलाही पदकाची आशा आहे. मुष्टियुद्धात जगज्जेती निखत झरीन कशी कामगिरी करत आहे याकडे भारताचे लक्ष आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताने ब्रॉन्झ पदक जिंकले होते. यावेळी ते सुवर्णाला गवसणी घालतील अशी आशा क्रीडा रसिकांना आहे. भारतीय महिला कुस्तीगीरांनी ऑलिम्पिकसह अनेक जागतिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. कुस्ती महासंघाचा वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह याच्या विरोधात लढण्यात गेले वर्ष महिला कुस्तीपटूंसाठी त्रासदायक ठरले. त्यावर मात करत त्या या स्पर्धेत पुन्हा चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. तिरंदाजी व नेमबजीत महिला व पुरुष खेळांडूंकडून भारतास जास्त आशा आहेत. अन्य देशांच्या तुलनेत आपल्या खेळांडूंना आर्थिक पाठबळ फार कमी मिळते, त्यांना सरावासाठी चांगल्या सुविधाही उपलब्ध नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे; पण ऑलिम्पिक  केवळ जिंकण्यासाठी नसते. त्यात भाग घेणे हेच मानाचे असते. हा उत्सव खिलाडू वृत्तीचा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

Related Articles