मुंबईत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू   

रहिवासी, प्रशासनाच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबई : नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून  ढिगार्‍याखालून दोन जखमींची सुटका करण्यात यश आले. इमारत कोसळण्यापूर्वी रहिवाशांनी इमारतीला तडे गेल्याचे पाहिले होते. त्यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला तात्काळ दिली. प्रशासनाने अनेकांना इमातीतून दुसरीकडे हलविले होते. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.सीबीडी बेलापूर परिसरातील शाहबाझ परिसरात शनिवारी पहाटे साडेचार वाजता इमारत कोसळली होती. इमारत जुनी होती. तिला तडेही गेले होते. त्यामुळे इमारत कोसळण्यापूर्वीच ५२ जणांना हलविल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. इमारतीत १३ सदनिका आणि दुकाने होती. ढिगारे उपसल्यानंतर दोन जखमी अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुत कैलाश शिंदे यांनी दिली.  दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.    
 
शोध व मदत कार्य राबविले. दुपारी पहिला मृतदेह ढिगार्‍याखालून काढला. नंतर अन्य दोघांचे मृतदेह सापडले होते. मोहम्मद मिराज अल्ताफ हुसेन (वय ३०), मिराज सैफ अन्सारी (वय २४) आणि सफीक अहमद रहमत अन्सारी (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. 
 
आयुक्त शिंदे यांनी सांगितले की, इमारत दहा वर्षे जुनी होती. ती कोसळण्याच्या कारणांचा तपास केला जाईल. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दलाचे पुरूषोत्तम जाधव म्हणाले, काल सकाळी इमारतीला तडे गेल्याचे रहिवाशांनी पाहिले होते. प्रशासनाला त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील ५२ रहिवाशांना हलविले होते. त्यामध्ये १३ मुलांचा समावेश होता. यानंतर काही वेळेत इमारत कोसळली होती.  लाल मोहम्मद (वय २२) आणि रुसाना (वय २१) यांना पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास ढिगार्‍याखालून बाहेर काढले आहे. तसेच ढिगार्‍याखाली आणखी एकजण अडकल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधल्यावर त्याने तेथे दोन मित्र असल्याचे सांगितले. श्वान पथक आणि मदत पथकाने त्यांची सुटका केली. दरम्यान, नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला गेलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी तेथून आयुतांशी फोनवर चर्चा केली. तसेच लागेल ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. ढिगारे उपसण्याचे काम अजूनही सुरू आहे. दम्यान, गेल्या आठवड्यापासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडसह विविध शहरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

Related Articles