३५ हजार कोटींची तरतूद   

अर्थ खात्याचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित 

मुंबई,  (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्षांत ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे.  राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य व  सक्षमीकरणासाठी त्यांचा मान, सन्मान आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य सरकारची  तयारी आहे. या योजनेला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
 
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी राज्याचे अतिरिक्त अंदाजपत्रक सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेनुसार पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी वर्षाला अंदाजे ४६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खर्चाचा हा बोजा सरकारी तिजोरीला सहन करणे शय नसल्याने अर्थ विभागाचा या योजनेला विरोध असल्याच्या बातम्या येत होत्या.  या बातम्यांचा अजित पवार यांनी काल स्पष्ट शब्दांत इन्कार केला.
 
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, तसेच राज्याचा अर्थ आणि नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्याच्या २०२४-२५ च्या अतिरिक्त अंदाजपत्रकात सादर केली आहे. अर्थ आणि नियोजन, सर्व संबंधित विभाग, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा  अंदाजपत्रकात करण्यात आली. चालू आर्थिक वर्षांत योजनेसाठी आवश्यक अशा  संपूर्ण रकमेची तरतूदही अंदाजपत्रकात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार? हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शय आहे, असे अजित  पवार यांनी सांगितले.
 

Related Articles