इम्रान यांच्यासह नेत्यांच्या सुटकेसाठी देशव्यापी आंदोलनाचा इशारा   

पंजाब प्रांतात नेते, कार्यकर्त्यांना अटक

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह नेते, कार्यकर्त्यांची सुटका तातडीने करण्याची मागणी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाने शुक्रवारी केली आहे. तसेच या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, जमात ए इस्लाम पक्षाने देखील वाढते वीज बिल आणि अन्य महागाईच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, पंजाब प्रांतात इस्लामाबादकडे जाणार्‍या दोन्ही पक्षांच्या १५० जणांना पोलिसांनी अटक केली. 
 
दरम्यान, इम्रान यांना गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी तोशखाना प्रकरणी प्रथम अटक झाली होती. निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर कारवाई झाली होती. यानंतर विविध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते दोषी ठरले होते. त्यांना न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली होती. सध्या ते रावळपिंडी येथील अदिला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यासह अन्य नेत्यांनाही शिक्षा झाली आहे. इम्रान यांच्या सुटकेसाठी ९ मे रोजी कार्यकर्त्यानी हिंसाचार केला होता. या प्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावली होती. इम्रान आणि अन्य नेत्यांच्या सुटकेसाठी राजधानी इस्लामाबाद येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाने जाहीर केले. तर जमान ए इस्लामी पक्ष संसदेच्या समोरील चौकात महागाईविरोधात आंदोलन करणार आहे. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली आहे. कोणत्याही प्रकारचे मेळावे, प्रचार सभा किंवा आंदोलने करू नयेत, असे आदेश काढले आहेत. तसेच इस्लामाबादजवळच्या फैजाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. रावळपिंडी येथून इस्लामाबादकडे येणारा हा प्रमुख मार्ग आहे. 
 
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात पाकिस्तान इन्साफ पक्ष आणि जमात ए इस्लाम पक्षाच्या १५० नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते इस्लामाबादकडे रवाना होण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाहोर, मुलतान, गुजरनवाला आणि फैसलाबाद जिल्ह्यात कारवाई करण्यात आली. केवळ येथेच नव्हे तर अन्यत्र अटकेचे सत्र सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस अधिकार्‍यांनी दिला. 

Related Articles