कल्याणीनगर अपघात प्रकरणात ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल   

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांकडून सहा आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी प्राथमिक ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच, सीसीटीव्हीचे पंचनामे, टेनिकल पुरावे,‘क्रॅश इम्पॅट असेसमेंट अहवाल, एफएसएलने दिलेले अहवाल ही पोलिसांनी न्यायालयात दिले आहेत.
 
विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०), शिवानी अग्रवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक बाशा मकानदार, अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध  दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने पबमध्ये मित्रासह मद्य प्राशन करुन भरधाव पोर्श मोटार चालवत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन आयटी अभियंता तरुणांचा बळी घेतला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
बाल न्याय मंडळाने मुलाला तत्काळ जामीन देताना ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितल्याने समाजमध्यमात टीकेची झोड उठली होती. यादरम्यान मुलाच्या आई वडिलांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या कटात ससून रुग्णालयाच्या डॉटरांचा देखील सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. या सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोषारोपपत्रानुसार, पोर्शे प्रकरणात आतापर्यंत ५० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे, यात प्रत्यक्षदर्शींच्या ही समावेश आहे. 
 
आम्ही आरोपींविरुद्ध प्राथमिक दोषारोप पत्र दाखल केले आहे. पुढील काही दिवसात १७३ (८) प्रमाणे पुरवणी दोषारोपत्र दाखल करण्यात येईल. डीएनए आणि इतर काही अहवाल येणे बाकी आहे. ते पुरवणी दोषारोपपत्र सोबत देण्यात येतील.
 
- शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)

Related Articles