सिंहगड रस्ता परिसरात हाहाकार   

एकतानगर, निंबजनगर पाण्याखाली

पुणे : पुण्यातील सिंहगड परिसरातील एकता नगर आणि निंबज नगरात गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या भागात पहिल्या मजल्यापर्यंत म्हणजे सहा फुटांपर्यंत पाणी आले होते. खडकवासला धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे आमचा संसार उद्ध्वस्त झाला, असा आरोप नागरिकांनी  प्रशासनावर केला.अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह फर्निचर पाण्याखाली गेले. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते.
 
सिंहगड परिससरासह द्वारका सोसायटी, घरकुल सोसायटी, आनंदनगरमधील अनेक सोसायट्यांमधील तळमजल्यावर असणार्‍या घरात पाणी शिरले. अनेकांच्या घरात वयोवृद्ध नागरिक असल्याने त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. मदतीसाठी वेळेवर प्रशासन आले नसल्याचा संतापही नागरिकांनी व्यत केला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सिंहगड रस्ता परिसरात एनडीआरएफचे जवान मदतीसाठी तैनात झाले होते. एकतानगर आणि निंबजनगर भागात प्रशासनाकडून बोटीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढले जात होते. अग्निशमन विभागाकडून योग्य ती खबरदारी घेऊन  बोट, दोर, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग अशा विविध उपकरणांचा वापर करत नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले. काल सकाळी ११ पर्यंत अग्निशमन दलाने जवळपास १६० नागरिकांची सुखरुप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.  निंबज नगर परिसरातून ७० नागरिकांची सुटका करण्यात आली. निंबज नगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. घरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ आणि पाणी पुरविले जात होते. अग्निशमन आणि एनडीआरएफ पथकाने अनेक नागरिकांची सुटका केली. स्थानिक प्रशासनासह आणि अग्निशमन दलही मदत आणि बचाव कार्यात युद्धपातळीवर कार्यरत होते.  सायंकाळी २४ मराठा बटालियन औंधचे १०० जवान सिंहगड रस्त्यावर बचाव कार्यासाठी दाखल झाले होते.एकता नगर, निंबज नगर तसेच आनंदनगर भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम त्यांनी केली. रुग्णांची विशेष काळजी घेताना त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.  

सिंहगड रस्ता परिसरात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पावसामुळे सिंहगड रस्ता परिसरात रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. एकता नगर, निंबज नगरमधील सोसायट्यामध्ये सहा फुटांपर्यंत पाणी शिरले. घरात पाणी बाहेर काढताना नागरिकांना मोठा आटापिटा करावा लागला. जो-तो संसार वाचविण्याचा प्रयत्नात होता. एकता नगर व निंबज नगर भागात सहा फुटापर्यंत पाणी आल्याने नागरिक छतावर जाऊन मदतीची वाट पाहत होते. मुलाबाळांना खांद्यावर घेऊन पाण्यातून रस्ता काढत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे कार्य कुटूंबप्रमुख करीत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, प्रशासनाकडून बोटीद्वारे बचार्वकार्य सुरू होते. शेकडो नागरिकांची बोटीद्वारे सुटका करण्यात आली. यासोबतच, दोरीच्या सह्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत होते.बऱ्याच  ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्याखाली गेली. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंसह सिलिंडरदेखील पाण्यात वाहून गेले. पूरस्थितीमुळे या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. दरम्यान, प्रशासनाच्या नियोजनाअभावी  पूरस्थितीला तोंड देण्याची वेळ आली, असा आरोप व संताप स्थानिकांनी केला.

Related Articles