पाऊस आणि पूर (अग्रलेख)   

मुठा नदीत विजेची जिवंत तार गेल्याने विजेचा धक्का बसून तिघांना प्राण गमवावे लागणे हा वीज मंडळ व प्रशासन यांच्या वरील डाग आहे. किमान खबरदारीही न घेतल्याने तीन जीव हकनाक गेले आहेत.
 
यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्राच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या तुलनेत पुणे  शहर व परिसरात पावसाचा फार जोर नव्हता. मात्र गेल्या सोमवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला, त्यात सातत्यही होते. गेले दोन दिवस तर संततधार सुरू होती. पुण्याला पाणी पुरवणार्‍या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोराचा पाऊस झाला. या धरण साखळीतील खडकवासला हे छोटे धरण लगेच भरले आणि त्यातून पाणी सोडण्यात आले. मुठा नदीत यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पाणी वाहू लागले. अर्थात हा घटनाक्रम आनंददायी नव्हता. गेल्या महिन्यात पहिला जोराचा पाऊस झाला तेव्हा पुण्याचे हाल झाले होते, त्याची ‘बिघडून वाढलेली’ आवृत्ती आता दिसत आहे. पुणे शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतुकीची कोंडी झाली. झाडे पडण्याच्या घटना नोंदल्या गेल्या. नदी लगतच्या भागांत अनेक निवासी इमारतींच्या तळमजल्यांत पाणी घुसले व तेथील रहिवाशांना बाहेर पडणेही मुश्कील झाले. त्यांना दूध व खाद्य पदार्थ पुरवण्यासाठी आपत्ती निवारण पथकांची मदत घ्यावी लागली. सततच्या पावसाने शाळा-महाविद्यालये, औद्योगिक संस्था बंद ठेवणे भाग पडले. सर्वात वाईट म्हणजे पावसामुळे दुर्घटना घडून पुण्यात  किमान चार बळी गेले.

नियोजनाचा बोजवारा

या वर्षी पावसाळ्यात किंवा मान्सूनच्या हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने मार्चमध्येच  व्यक्त केला होता. महाराष्ट्र व पुण्यात पाऊस थोडा उशिरा आला, त्याचा जोरही प्रारंभी फार नव्हता. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात  तसेच मराठवाड्यात जोरदार पाऊस होत असल्याच्या बातम्या येत होत्या. मुंबईत नेहेमीप्रमाणे भरपूर पाऊस होत होता. गेल्या आठवड्यापासून पुण्यात खर्‍या अर्थाने पावसाळा सुरू झाला. गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता संपलेल्या चोवीस तासांत ८५.७ मिलिमीटर पावसाची नोंद शिवाजीनगरमध्ये झाली. गेल्या १२ वर्षांतील हा उच्चांक आहे. पुण्याजवळच्या लव्हासा येथे  या काळात  २०५.५ व लवळे येथे ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अशा पावसाने पुणे व परिसराची वाताहत झाली. दर वर्षीचे चित्र आहे. याचे कारण पुणे शहराचा विकास झालाच नाही, झाली ते बेसुमार वाढ. पुण्याजवळची अनेक गावे नकाशावर  रेघा ओढून महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली. त्यांच्या मूलभूत सुविधांचा विचार तेव्हा झाला नाही. या गावांत अगदी गेल्या महिन्यापर्यंत तीव्र पाणी टंचाई होती. कारण त्यांना पाणी पुरवण्याची व्यवस्थाच झालेली नाही. त्यामुळे ‘टँकर माफियां’नी पाण्यासारखा पैसा कमावला. जलनिस्सारण, मलनिस्सारण यांच्याही सुविधा या भागांत नाहीत. त्यामुळे थोडा जोराचा पाऊस झाला तरी तेथे पाणी तुंबते, वाहतूक विस्कळीत होते. जोरदार व संततधार पाऊस झाल्यावर  तर त्या भागांच्या व तेथील रहिवाशांच्या हालास पारावार राहात नाही. निवासी भागात  पूर येणे व रहिवाशांना बाहेर  काढण्यासाठी आपत्ती निवारण पथकांची मदत घेण्याची वेळ या नियोजनशून्य कारभारामुळे आली आहे. पूररेषा असताना त्या मध्येही बांधकाम होत असताना प्रशासन  व सरकार तिकडे दुर्लक्ष करते. मते व पैसा यांचे गणित त्या मागे असते हे सर्वांना माहीत आहे. पुण्यालगतच्या पिंपरी-चिंचवड भागातही अशीच परिस्थिती आहे. तेथेही पवना व इंद्रायणी या नद्यांचे पाणी शहरांच्या निवासी भागात घुसले आहे. मुंबईतही जोरदार पाऊस सुरू असला तरी अजूनपर्यंत पुणे-मुंबई रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झालेला नाही; पण रेल्वे सेवा बंद पडणार नाही, याची शाश्वती नाही. पावसावर  माणसाचे नियंत्रण नाही, मात्र जोराचा पाऊस झाल्यास काय करावे याचे नियोजन करणे हाती आहे. पाण्याचा निचरा करण्याच्या सोयी अजूनही पुणे, मुंबई या शहरांत अपुर्‍या का आहेत याचा सरकार  व प्रशासनाने विचार  केला पाहिजे.  पाणी साठवण्यासाठी  पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा जनतेचे हाल होत राहतील व पुन्हा पुढच्या उन्हाळ्यात  पाणी टंचाई निर्माण होईल.

Related Articles