वाचक लिहितात   

साथींच्या आजारात वाढ

पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचतात. दिवसेंदिवस वाढणारा केर-कचरा, घाण यामुळे डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. त्यात रस्त्यांवर, गल्लीबोळात बेवारस वाहने पडलेली आहेत. त्यातच केर-कचरा, घाण साठल्याने डासांचे प्रमाण अजूनच वाढते. रस्त्यावर पडलेला राडारोडा ही याला कारणीभूत आहे. तसेच अनेक सार्वजनिक बागांमध्ये नियमित साफसफाई होतच नाही व कचराही उचलला जात नाही. धरण साठ्यातील जलपर्णीसुद्धा वाहून येऊन नदीपात्रात ठिकठिकाणी अडकून डासांचे प्रमाण वाढले आहे. खरेतर पावसाळ्यापूर्वी जलपर्णी काढली गेली नाही. व त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. याचा परिणाम साथींचे आजार वाढण्यामध्ये झालेले आहे. चिकुनगुनिया, डेंगू, झिका व्हायरस यासारख्या महाभयंकर रोगापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासनच सुस्त आणि सर्वसामान्य नागरिक साथीच्या आजाराने त्रस्त.! अशी परिस्थिती सगळीकडे पाहण्यास मिळत आहे. सर्व सामान्य नागरिकांनी आपल्या आरोग्याची जबाबदारी आपण स्वतःच घेतली पाहिजे. 

अनिल अगावणे, पुणे

पर्यटन क्षेत्रात रोजगार वाढले

हल्ली पर्यटन क्षेत्राचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे. अनेक जण आपल्या साठवलेल्या पैशातून हमखास कुठली ना कुठली सहल आयोजित करत आहेत. यासाठी ते पैशाची थोडी थोडी बचत सुद्धा करत आहेत. त्यामुळे विविध पर्यटनस्थळांवर हल्ली गर्दी दिसते. या क्षेत्रात अनेक जण नोकर्‍यासुद्धा करत आहेत. यामध्ये गाईड, छायाचित्रकार टुर गाईड अशांचा समावेश आहे. दुभाषे यांना सुद्धा मोठा वाव आहे. कोविड १९ च्या साथीनंतर यात विशेष वाढ झाली आहे. कित्येक जण परदेशी टूरलासुद्धा जात आहेत. त्यामुळे अनेक यात्रा कंपन्या यात गजबजून गेल्या आहेत. एका आकडेवारीनुसार येत्या सुमारे नऊ वर्षात देशात जवळपास ५.८२ कोटी नोकर्‍या पर्यटन क्षेत्रात उपलब्ध होतील, अशा या क्षेत्रातील जाणकारांचा विश्वास आहे. एकट्या २०२३ या वर्षात सुमारे १६ लाखांना रोजगार दिला होता. देशातील बेरोजगारी काही प्रमाणात तरी कमी करण्याचे श्रेय देशातील पर्यटन क्षेत्राला जाणार आहे. 

शांताराम वाघ, पुणे 

बेकायदा होर्डिंग हटवा

मुंबईच्या घाटकोपर येथील छेडानगर येथे उभारलेले बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा नाहक बळी गेल्यानंतर राज्य सरकार, मुंबई महापालिका, म्हाडा प्राधिकरण अशा सर्वांचेच डोळे उघडले. होर्डिंगबाबत मुंबई महापालिका आता नवीन धोरण आणणार असून इमारतींवर होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने पालिकेकडून सध्या मुंबईत कोणत्याही नवीन होर्डिंगना परवानगी देण्यात येणार नाही. दुसरीकडे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेणे अनिवार्य होणार आहे. शासकीय यंत्रणांचे हे सर्व आदेश, नियम, फतवे प्रत्यक्षात अंमलात येतील आणि लवकरच शहरातील बेकायदा महाकाय भीतिदायक होर्डिंगना आळा बसेल अशी आशा आहे.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई 

कठोर शिक्षाच हवी

मुंबईच्या वरळीत एका राजकीय पक्षाच्या उपनेत्याच्या मुलाने आपल्या आलिशान बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला उडविले. त्यामुळे या घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मिहिर शहाने दारूच्या नशेत केलेलं हे कृत्य फक्त कायद्याला पायदळी तुडवणारंच नव्हतं, तर ते मानवता आणि नैतिकतेचाही मुडदा पाडणारं होते. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत कावेरी नाखवा यांना फरफटत नेले. या हृदय पिळवटून टाकणार्‍या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले. आपला आरोप ड्रायव्हरच्या नावावर टाकण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक झाली, त्याची जामिनावर सुटका झाली असली, तरी त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी.

राजू जाधव, मांगूर, जि. बेळगांव  

बांधकामातील भ्रष्टाचार

पायाभूत रचना अपयशी ठरल्याने भारतात अलिकडे काही दुर्घटना घडल्या आहेत. नवी दिल्लीतील विमानतळाच्या एक क्रमांकाच्या टर्मिनलचे छत कोसळून एक व्यक्ती मरण पावली आणि इतर आठ जण जखमी झाले. अशी घटना घडलेली असताना देशात इतरत्र रेल्वे अपघात आणि पूल कोसळण्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. २०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या काळात देशभरात ३२ पूल कोसळले, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. बांधकाम व्यवसायात भरीव गुंतवणूक करण्यात आली असूनही समस्या होती तशीच आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी २ लाख ७ हजार कोटी असा विक्रमी खर्च करण्यात आला. असे असले तरी बांधकामाच्या दर्जातील त्रुटी आणि भ्रष्टाचार यामुळे चिंता निर्माण व्हावी असेच वातावरण निर्माण झाले आहे.         

अनिल तोरणे, तळेगाव दाभाडे

Related Articles