माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा   

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. आता चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपमध्ये येतील.
 
फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील बरेच चांगले नेते, हे भाजपच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या…”
 
अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तशी पत्रे त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

आमदारकीचाही राजीनामा

 
अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारे एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यापाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिले आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हा पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.
 
त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी एक्स (ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला.” तसेच चव्हाण यांनी समाजमाध्यमांवरील त्यांच्याबाबतची माहिती अपडेट केली आहे. वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर असलेल्या त्यांच्या प्रोफाईलवरील काँग्रेससंबंधीची सर्व माहिती हटवण्यात आली आहे.
 
दोन दिवसांत भूमिका स्पष्ट कारेन 
 
मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केले. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन.
 
यावेळी चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्ही भाजपात जाणार का? भाजप तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यात किती तथ्य आहे? यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला भाजपाची कार्यप्रणाली माहिती नाही. भाजपमध्ये जाण्याचा मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन.
 
काँग्रेस सोडण्याबाबत प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलेच पाहिजे असे नाही. मी जन्मापासून काँग्रेसचे काम केले  आहे, आता मला वाटले अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे.” पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला कोणतीही पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही, किवा उणीदुणी सांगायची नाहीत. कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराशी माझे काही बोलणं झाले नाही. काँग्रेस सोडणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी मंत्री असताना भाजप सहित सर्व पक्षांच्या आमदारांना निधी दिला आहे. मी कधीही भेदभाव केला नाही.
 

Related Articles