इस्रायलसोबतचा शांतता करार रद्द करू   

रफाह : गाझाच्या दाट लोकवस्ती असलेल्या रफाहमध्ये इस्रायली सैन्य पाठविल्यास शांतता करार रद्द करू, अशी धमकी इजिप्तने इस्रायलला दिली आहे. इस्रायली सैन्याने रफाहमध्ये हमासविरोधात लढा दिल्यास या प्रदेशाच्या मुख्य मदत पुरवठा मार्ग बंद होऊ शकतो, असे दोन इजिप्शियन अधिकार्‍यांनी रविवारी सांगितले.
 
हमास विरुद्ध चार महिने सुरू असलेले युद्ध जिंकण्यासाठी रफाहमध्ये सैन्य पाठवणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे.
गाझाच्या 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक इतर भागातील लढाईपासून वाचण्यासाठी रफाहला पळून आले आहेत. सीमेजवळील मोठ्या तंबू छावण्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आश्रयस्थानांमध्ये ते थांबले आहेत.  रफाहमध्ये इस्रायलने हल्ला केल्यास गाझामधील मानवतावादी परिस्थिती आणखी बिघडेल. पॅलेस्टिनी निर्वासितांचा मोठा ओघ इजिप्तला येण्याची भीती आहे, त्यामुळे रफाहमध्ये इस्रायली सैन्याने हल्ला केल्यास शांतता करार रद्द करण्याची धमकी इजिप्तने दिली आहे. 
 
मध्य गाझा आणि दक्षिणेकडील खान युनिस शहरात जोरदार लढाई सुरू आहे. रफाहमधील हल्ल्याने शहरातील आवश्यक अन्न आणि वैद्यकीय पुरवठा वितरीत करण्याचा एकमेव मार्ग कापला जाऊ शकतो. कतार, सौदी अरेबिया आणि इतर देशांनीही इस्रायलने रफाहमध्ये सैन्य हलविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
 
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत संपूर्ण प्रदेशात ठार झालेल्या 112 लोकांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत, तसेच 173 जखमी लोक आहेत. युद्धाच्या सुरुवातीपासून या पट्टीतील मृतांची संख्या 28 हजार 176 वर पोहोचली.
 

Related Articles