पेटीएम : थांबा आणि वाट पाहा   

भाग्यश्री पटवर्धन

 
पेटीएमच्या शेअरचे काय करायचे असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर थांबा आणि वाट पाहा असे राहील. गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये जी वधघट दिसून आली त्यावरून कंपनी प्रवर्तकांना काही अप्रिय निर्णय घ्यावे लागतील असे दिसते; मात्र ते निर्णय भागधारकांचे हित दीर्घकाळ जपणारे असतील आणि पेटीएम पेमेंट बँकेचा व्यवसाय कंपनीने विकल्यास त्याचा फायदा शेअर वर जाण्यात होईल.
 
बँकेतर कंपन्यांना डिजिटल वित्तीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व बँकेने परवाने देण्यास सुरुवात केली तेव्हापासून जो धोका जाणकारांकडून व्यक्त केला जात होता तो खरा ठरला आहे आणि कोट्यवधी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वित्तीय सुविधा म्हणजे देयकासाठी जी पे, फोन पे, पेटीएम, झोमॅटो, जिओ अशा कंपन्यांना मिळालेली परवानगी. त्यातील एका म्हणजे पेटीएमने त्याचा केलेला गैरवापर केवळ ग्राहकच नाही, तर ज्या भागधारकांनी 2100 रुपयांना वन 97 कम्युनिकेशन्स या प्रवर्तक कंपनीचे शेअर प्राथमिक भागविक्रीवेळी अर्ज करून खरेदी केले त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केवायसी म्हणजे आपण सर्वांना बँकेत ओळख पटवण्यासाठी जी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते ती न करता असंख्य ग्राहकांना सुविधा देण्याचा नियमबाह्य प्रकार पेटीएमबाबत झाला. रिझर्व बँकेने संबंधित कंपनीच्या संचालकांना याची वारंवार कल्पना देऊनही सुधारणा झाली नाही. केवळ कल्पना दिली गेली नाही, तर भरपूर वेळही देण्यात आला. याआधीच्या एका स्तंभात उल्लेख केल्याप्रमाणे प्रवर्तकांच्या भागभांडवलातील हिस्सा किती यापेक्षा त्यांचे वर्तन कसे आहे हे गुंतवणूकदाराने कायम तपासत राहिले पाहिजे. अदानी समूहाबाबत तोच अनुभव आला आणि येत आहे. रिझर्व बँकेने पतधोरणात कोणताही बदल केलेला नाही; मात्र या विषयी झालेल्या पत्रकार परिषदेत बहुतेक प्रश्‍न पेटीएमचे पुढे काय होणार आणि फिनटेक म्हणजे वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे भविष्य काय राहणार अशी विचारणा झाली. या पार्श्वभूमीवर पेटीएमच्या शेअरचे काय करायचे असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर थांबा आणि वाट पाहा असे राहील. गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये जी वधघट दिसून आली त्यावरून कंपनी प्रवर्तकांना काही अप्रिय निर्णय घ्यावे लागतील असे दिसते; मात्र ते निर्णय भागधारकांचे हित दीर्घकाळ जपणारे असतील आणि पेटीएम पेमेंट बँकेचा व्यवसाय कंपनीने विकल्यास त्याचा फायदा शेअर वर जाण्यात होईल. 29 फेब्रुवारीच्या मुदत कंपनीला आरबीआयने दिली आहे. तोपर्यंत थांबा आणि वाट पाहा धोरण भागधारकांनी स्वीकारावे. कंपनीच्या कारभाराची झाडाझडती होऊन सुधारणा अमलात आल्या, तर ते सर्वांच्या हिताचे राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी या शेअरच्या फंदात न पडलेले बरे. गेल्या 52 आठवड्यांतील कमाल किमान भाव (52- wk high सह 998.3052- wk low 395.00) आहे.
 

कॅनरा बँक 8 महिन्यांत 350 वरून 540 रुपये!

 
‘केसरी’च्या वाचकांना या स्तंभात ज्या शिफारशी सुचवल्या जातात त्यापैकी बहुतेक बाबतीत दीर्घकाळ विचार केल्यास नफा झालेला आढळून येईल. मागील आठवड्याचा स्तंभ लिहिताना कॅनरा बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा शेअर घ्यावा, असे जून 2023 मध्ये सुचवल्याचे लक्षात येईल. त्याच आठवड्यात कॅनरा बँकेने येत्या 26 तारखेला शेअर विभाजन प्रस्ताव मंजुरीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलावल्याचे जाहीर केले. लाभांशाचा इतिहास आणि भावी काळातील फेररचना पाहता कॅनरा बँकेचा शेअर लाभदायक ठरेल, यात शंका नाही, असे 350 रुपये भाव असताना सुचवले होते. बातमी येताच हा शेअर 540 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला. ही वाढ अवघ्या आठ महिन्यांत दिसून आली आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारने मागील महिन्यात घोषणा केली आणि त्याच्याशी संबंधित शेअर वधारल्याचे आपण मागील स्तंभात पाहिले. देशातील सर्वांत मोठ्या म्युच्युअल फंड कंपनीने नुकताच या क्षेत्रासाठीचा खास फंड बाजारात आणला आहे. एसबीआय एनर्जी ऑपॉर्च्युनिटिज् फंड असे त्याचे नाव असून 5000 रुपये किमान गुंतवणूक करावी लागेल.
 

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

 

Related Articles