चौकशी बंद करण्यासाठी सत्तेत!   

अजित पवारांवर शरद पवारांची टीका

 
पुणेे : काही नेतेमंडळीं राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेले, असे सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.   
 
पुण्यात पक्षाचा मेळावा रविवारी आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव हे अजित पवार गटाला दिले. यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केला होता. दरम्यान, अजित पवार हे अनेकदा राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला आणि सत्तेत सहभागी झाले, असे सांगतात. त्यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेताना शरद पवार यांनी अजित पवारांवर टीका केली. ते  म्हणाले, कार्यकर्त्यांनो तुम्ही जागृत राहा आणि कष्ट करा, महाराष्ट्र तुमच्यासोबत राहील, जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला मिळणार आहे. 
 
ते पुढे म्हणाले, ’आज देशात कोणीही भाजपच्या विचारांच्या विरोधात भूमिका घेतली की, त्याच्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ईडी हा शब्द कोणालाही माहिती नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचला आहे. या काळात ईडीचा गैरवापर झाला.
 
2014 ते 2023 या काळात ईडीकडून एकूण सहा हजार खटले नोंदवण्यात आले. चौकशीनंतर त्यापैकी केवळ 25 प्रकरणांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे. मात्र, या 25 पैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. ईडीच्या या सगळया कामासाठी जवळपास 404 कोटी रुपये खर्च झाले, असेही शरद पवार यांनी सांगितले.
 
ईडी कोणाच्या मागे लागली? याकडेही पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नेत्यांच्या चौकशा झाल्या. यापैकी 85 टक्के नेते हे विरोधी पक्षांतील आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ईडीचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. भाजपच्या काळात 121 नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, कारवाई झालेल्यांमध्ये  भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, असेही पवार म्हणाले.
 

Related Articles