देशात सरकारची दडपशाहीच सुरू : सुप्रिया सुळे   

बारामती, (वार्ताहर) : देशात सध्या लोकशाही राहिलेली नाही, ही सरकारची दडपशाहीच सुरू आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेला नाही, सध्या गुंडाराज सुरू आहे. या गुंडगिरीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना व्यक्त केले.
 
सुप्रिया सुळे या बारामती दौर्‍यावर असताना बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. पुढे सुळे म्हणाल्या की, पाण्याच्या टंचाईबाबत राज्य सरकारला अनेक माध्यमातून विनंती केली, तसेच बेरोजगारी बाबत देखील केंद्र सरकारला अनेकदा सांगून देखील फायदा होत नाही. सरकार कोणतीच भूमिका घ्यायला तयार नाही, शेतकर्‍याला हमीभावही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे. शेतकर्‍यांच्या विरोधातील हे सरकार असून, शेतकर्‍यांनी जर पिकविण्याचे बंद केले तर या देशाचे काय होईल, असा सवाल उपस्थित करीत सरकारने वेळीच याविषयी विचार केला पाहिजे असेही व्यक्त केले.
 
तर आंध्रप्रदेश, ओरिसा येथील आरक्षणाचे प्रश्न सरकारने लोकसभेत मांडले, मग राज्यातील मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचा मुद्दा का आणला नाही, महाराष्ट्र सरकारने राज्यातील आरक्षणाचे प्रश्न केंद्र सरकारकडे पाठवलेलेच नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे, इतर राज्य पाठवतात, मग महाराष्ट्र सरकार का प्रश्न पाठवत नाहीत, असा सवाल सुळे यांनी माध्यमातून सरकारला विचारला आहे. तर मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा आंदोलन करीत आहेत, तर त्यांची ही सरकारने केलेली फसवणूक नाही तर काय आहे? असाही सवाल सुळे यांनी व्यक्त केला.
 

Related Articles