पुणेकरांकडून मुळा-मुठा नदीची स्वच्छता   

’माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन’ उपक्रम

 
पुणे : शहरातील प्रत्येक नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास आणि जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीचा विचार करून ’वर्शीप अर्थ फाउंडेशन’ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ’माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन’ उपक्रमांतर्गत हजारो पुणेकरांनी मुळा-मुठा नदीची स्वच्छता केली. 
 
भिडे पूल येथील मुळा मुठा नदी पात्रात रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमात निवडणूक साक्षरता मंच, एनएसएस, विलू पुनावाला फाउंडेशन, फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन, जागृती ग्रुप आणि मूव्हमेंट ऑफ पॉझिटीव्हीटी, तसेच शहरातील अनेक शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदविला होता. 
 
यावेळी वर्शीप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष पराग मते, व्यवस्थापकीय संचालक तेजस गुजराथी, राज देशमुख, अनय शिरगावकर, सूरज चव्हाण, नेहा गवळी, केतन सोवनी, स्नेहल खानोलकर, आम्रपाली चव्हाण, भाग्यश्री मंथळकर व्यवस्थापन परिषद सदस्य पुणे विद्यापीठ, सचिन कुलकर्णी, मुकुल माधव फाउंडेशन, विजय नाईकल, सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका, अभिनेत्री किरण दुबे, सोनल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
पराग मते म्हणाले, ’माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन’ या उपक्रमाचे 5 वे वर्ष असून हा उपक्रम 16 जिल्ह्यांमध्ये एकच वेळी राबविला जातो. आज या उपक्रमात हजारो युवक युवती सहभागी होत आहेत. येणार्‍या पिढीला नद्या स्वच्छ पाहता याव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
 
एक जागरूक नागरिक म्हणून नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे असा विचार करून ’वर्शीप अर्थ फाउंडेशन’चे संस्थापक-अध्यक्ष पराग मते आणि त्यांचे सहकारी आदींनी 2020 मध्ये या नदी स्वच्छतेच्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.नदी हे त्या शहराचे जीवन असल्यामुळे तीच आपली ’व्हॅलेंटाईन’ अशी संकल्पना मांडून या उपक्रमाला ’माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन’ असे नाव देण्यात आले. नदी स्वच्छतेच्या उपक्रमानंतर यावेळी विद्यार्थ्यांनी लोकसंगीत आणि पथनाट्य सादर करत या नद्या स्वच्छ करण्यासंदर्भात जन जागृतीपर संदेश दिले.
 

Related Articles