रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले : योगी आदित्यनाथ   

पिंपरी : समर्थ गुरू रामदास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. पुढे त्यांनी पूर्ण भारतात तेज फडकवले. औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबाला असे मरण्यासाठी सोडले की त्याला आजपर्यंत कोणी विचारत नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. इथे संतांचे सान्निध्य आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केले.
 
आळंदी येथे प.पू. गोविंदगिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त गीता भक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रविवारी आळंदीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते गीताभक्ती महोत्सवाला उपस्थित राहिले. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.
 
योगी आदित्यनाथ म्हणाले, पूज्य स्वामींचे सन्निध्य व मार्गदर्शन सनातन धर्माचे पालन करणार्‍यांना दीर्घकाळ लाभो. मी नाथ संप्रदयाचा सर्वसाधारण अनुयायी आहे. सनातन धर्मानुसार गुरुपरंपरेने पूर्ण समर्पणेने कार्य करतो. आपली परंपरा एक साथ चालते. अवघ्या 15 व्या वर्षी ज्ञानेश्वरीचा उपदेश देऊन भक्तांना नवीन मार्ग दाखवला. ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. भारताच्या अध्यात्माला पूर्ण भूमंडळावर फडकवण्याचे काम ज्यांनी केले, त्या पंरपरेचे दर्शन झाले हे माझे भाग्य आहे. एका परिवरामध्ये चार संतांचा उदय झाला. यामुळे महाराष्ट्रातील नागरिक सौभाग्यशाली आहेत. 
 
येथे संतांची कृपा वर्षाव करते. येथील भक्तांनी आपल्या पूज्य संतांना एवढ्या उंच स्थानी नेऊन ठेवले आहे की शक्ती सुद्धा सोबत चालत आहे. या शक्तीचा अद्भुत संगम छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या रूपाने महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना दिसून येते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आग्रा येथील मोगल म्युझियमचे नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवले. आमचा संबंध छत्रपतींशी आहे. मोगलांशी नाही. आम्ही तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती ठेवण्याचे कार्य करत आहोत. उत्तर प्रदेशातील डिफेन्स कॉरिडोर ही छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित आहे. आता अयोध्येत राम मंदिर पाहण्याचे अलौकिक क्षण आपल्याला प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
 

Related Articles