श्रीशैलम मंदिराच्या प्रसादात हाडांचे तुकडे   

अमरावती : आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मंदिराच्या प्रसादात हाडांचे तुकडे आढळले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी तक्रार आल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने तपास सुरू केला आहे.
 
हैदराबादमधील हरीश रेड्डी नावाच्या भक्ताला दर्शनानंतर प्रसाद मिळाला होता, ज्यामध्ये भक्ताला हाडांचे तुकडे सापडले. यानंतर त्यांनी तात्काळ मंदिराच्या कार्यकारी अधिकार्‍यांच्या कार्यालयात पुराव्यासह लेखी तक्रार केली. या घटनेमुळे मंदिर व्यवस्थापन आणि स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत चिंता निर्माण झाली आहे. भक्ताने दिलेल्या तक्रारीला उत्तर देताना मंदिर प्रशासनाने या प्रकरणी चौकशी सुरू केल्याचे सांगितले. त्याचवेळी, भक्ताच्या प्रसादात सापडलेली वस्तू दालचिनीचे तुकडे असू शकते असा अंदाज मंदिर अधिकार्‍यांनी व्यक्त केला.
 
श्रीशैलम ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशच्या पश्चिमेकडील कुर्नूल जिल्ह्यातील नल्लमल्ला जंगलांमध्ये श्रीशैलम टेकडीवर वसलेले आहे. हे मंदिर मल्लिकार्जुन म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास सातवाहन घराण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. श्रीशैलम मंदिर दुसर्‍या शतकाच्या आसपास बांधले गेले. 

Related Articles