शेतकर्‍यांच्या मोर्चामुळे पंजाब -हरयाना सीमा बंद   

परिसरात लागू केले १४४ कलम 

 
चंडीगढ : उत्तर भारतातील शेतकर्‍यांनी उद्या (मंगळवारी) दिल्‍ली चलो मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंजाब- हरयाना येथील अंबाला येथील शंभू सीमा बंद केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत दिल्‍ली सीमेवर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. 
 
शेतमालाला हमी भाव देण्याचा कायदा करावा, या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरयाना आणि पंजाब येथील सुमारे 200 शेतकरी संघटना एकवटल्या असून त्यांनी दिल्‍लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणीही कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्‍लंघन करू नये, असे पोलिस उपायुक्‍त जॉय त्रिके यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह अन्य साहित्य घेऊन दिल्‍लीच्या दिशेने येणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी मोठी तयारी केली आहे. 
 
तेथे वाळूच्या पिशव्या, तारा आणि दंगली रोखणारी वाहने उभी केली आहेत. तसेच परिसरात 144 कलम पोलिसांनी लागू केले आहे.घाग्गर नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर लोखंडी पत्रे उभारले आहेत. तसेच जागोजागी पोलिसांनी बॅरेकेड्स टाकले आहेत. पाणी फवारणारी आणि वज्र वाहने जागोजगी उभी केली असून घाग्गर नदी पात्र खोदून ठेवले आहे. त्यामुळे कमी पाणथळ जागेतून नागरिकांना नदी पार करावी लागत आहे. पंजाब येथील जिंद आणि फतेहबाद जिल्ह्यात मोर्चा रोखण्यासाठी  जाखल परिसरात सिमेंटचे खांब आणि काटे असलेल्या पट्ट्या ठोकल्या आहेत. त्या माध्यमातून तेथील वाहतूक बंद केली आहे. त्याशिवाय अन्य दोन रस्तेही बंद केले आहेत.

 

Related Articles