माढा लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला?   

सातारा, (प्रतिनिधी) : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विकासकामांसह संसदेतही चांगली कामगिरी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह यांना गत निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देऊन जनता त्यांना विजयी करेल, असा विश्‍वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांनी व्यक्त केला. नड्डा यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचा माढा लोकसभेसाठी उमेदवार ठरल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
 
दिल्ली येथे रणजितसिंह यांनी दिल्ली येथे भाजपच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष नड्डा यांची भेट घेऊन त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची व प्रकल्पांची माहिती दिली. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान नड्डा यांनी समाधान व्यक्त केले.
 
माढा लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या मतदारसंघांमध्ये कोणतीही पाण्याची योजना शिल्लक ठेवली नाही. पाणी, रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर, एमआयडीसी ही महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावण्यामध्ये आपण यशस्वी झालो, तसेच संघटनेतील सर्व पदाधिकार्‍यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये कमी पडलो नाही. यापुढेही पक्ष संघटना व जनतेसाठी सातत्याने संपर्क ठेऊन मतदारसंघाचा विकास घडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही रणजितसिंह यांनी दिली. तुम्ही केलेल्या विकासकामांवर सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष, महायुतीतील घटक पक्ष, कार्यकर्ते, जनता समाधानी आहे. पुढील काळातही असेच चांगले काम करा, असा सल्लाही नड्डा यांनी दिला.
 

Related Articles